हाताला काम नसल्याने संकटात सापडलेल्या शेतमजुराने उसतोडीचा मार्ग निवडला आहे. ऊसतोडीची उचल घेऊन पररजिल्ह्यात जाण्याची तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे मजुरांचा यंदाचा दिवाळी सण उसाच्या फडातच साजरा होणार आहे. ऊसतोड मजूर बिन्हाड घेऊन कारखान्यांची वाट धरल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
आष्टी तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. अशातच यंदा पावसाने दडी मारल्याने शेतमजुराच्या हाताला काम नाही. आता रब्बी हंगामाचे दिवस असून परतीच्या पावसाने अद्यापही हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्याने शेतीकडे दुर्लक्ष करून मुकादमाकडून उचल घेत हाती कोयता घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे यंदा आष्टी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मजूर कुटुंबासह ऊसतोडणीसाठी जाणार आहेत. घरातील वयोवृद्ध आई, वडिलांकडे लेकराबाळाची व्यवस्था करून मजुराची लगबग सुरू झाली आहे. ऊसतोडीसाठी सुशिक्षित बेरोजगारांची संख्यादेखील वाढल्याचे दिसून येत आहे.
उचलीत वाढ, मुकादमाचा लागणार कस
मागील वर्षी एका ऊसतोडणी मजुराला एका कोयत्यासाठी ८० हजार रुपये दिले होते. परंतु, यंदा उचल दुप्पट म्हणजे एका कोयत्यासाठी दीड लाख रुपये झाली आहे. त्यामुळे मुकादमाचा कस लागणार आहे. उसाला प्रतिटन योग्य भाववाढ मिळाला तरच समाधान मिळेल. नाहीतर मनधरणीत करार संपल्याने मोठी आर्थिक गुंतवणूक अंगावर पडणार असल्याचे मुकादम विठ्ठल शेरकर यांनी सांगितले.