राज्यात तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. कमाल व किमान तापमानात वाढ होत असून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ व अं. से. वाढ होण्याची शक्यता आहे तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून कमाल व किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे.
हरभरा, करडईची करा मळणी
१.काढणी केलेल्या हरभरा व करडई पिकाची मळणी करून घ्यावी.
२.मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
संबंधित वृत्त-जळगावात ४३.२ सेल्सियस, नागपूर, अकोलाही चाळीशीपार, तुमच्या शहरात तापमान कसे?
हळदीची घ्या विशेष काळजी
१.हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी.
२.कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.
३.सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत.
४.कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे.
हेही वाचा- राज्यातील धरणांमध्ये सरासरी ४०.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक, कोणत्या विभागात किती पाणी?
फळबागेचे व्यवस्थापन
१. मृग बहार संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
२.जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.
३.नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.
डाळींब बागेचे काय कराल?
१.कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
२.जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी डाळींब फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.
३.नविन लागवड केलेल्या डाळींब रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.
हेही वाचा- उन्हाचा पारा वाढला, शेतकरी बांधवानो आरोग्य सांभाळा
चिकूची काढणी करा
१.काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.
२.कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
३.जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी चिकू फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.
४.नविन लागवड केलेल्या चिकू रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.