गेल्या दोन वर्षांपासून गडचिरोली जिल्हयातील वडसा वनविभागात रानटी हत्तींचा धुडगूस सुरूच आहे. यातच रानटी हत्तीच्या कळपाने खोब्रागडी नदी ओलांडून चार दिवसांपूर्वी इंजेवारीच्या जंगलातून प्रथमच पोल वनपरिक्षेत्रात प्रवेश केला.
दि. ११ ऑक्टोबर रोजी हत्तींनी पोर्ला वनपरिक्षेत्रातील पोर्ला, नगरी व मोहझरी येथील शेतात धुडगूस घालून धान पीक तुडविले. ऐन हलके धान पीक कापणीचा हंगाम सुरू असतानाच हत्ती दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीसह चिंता आहे.
ओडिशा, छत्तीसगडवरून आलेल्या रानटी हत्तीने जिल्ह्यात धूमाकूळ घातला आहे. शेती व्यवसाय पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे कधी फुटून अदृश्य होईल, हे सांगणे कठीण आहे. शेतकरी पक्षी, उंदीर, घूस, मुंगी, किडे, माकोडे, रानटी डुक्कर, जैविकांचे जीव जगवत आला आहे. नैसर्गिक वादळ वारा गारपिटीसह अकाली पाऊस तर कधी कोरडा दुष्काळ हे नित्याचेच असतांना रानटी हत्तीचे जहाजाएवढे पोटही शेतकऱ्याने भरायचे. ही विषयाची परीक्षा आहे. वनविभाग केवळ पंचनामे करण्याचे काम करीत आहेत.
हत्तींनी तीन गावातील पिकांची नासधूस केल्यानंतर २१ च्या संख्येत असलेल्या कळपाने सायंकाळी देलोडा- पोर्ला मार्ग ओलांडला, याची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. सध्या हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू आहे. मध्यम प्रतीचे धान निसवत आहे, तर जड़ प्रतीचे धान पंधरवड्यात निसवण्याची शक्यता आहे.
वनक्षेत्रातील गावे जंगलाला लागून
पोर्ला वनपरिक्षेत्रातील वसा, बोडधा, वडधा, बोरी, सिसी आदी गावे जंगलाला लागून आहेत.येथील शेतकऱ्यांचे धान पीक नष्ट होण्याची शक्यता असल्याने वनविभागाने हत्तींना जंगलाच्या दिशेने वळवावे, तसेच कळपावर नियंत्रण ठेवावे,अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
पोर्ला वनपरिक्षेत्रात सध्या तीन गावातील धान पिकांची नासधूस रानटी हत्तींच्या कळपाने केली आहे. ज्या शेतकयांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांनी पंचनाम्यासाठी वनपरिक्षेत्र कार्यालयात अर्ज सादर करावे. नुकसानग्रस्तांना १५ दिवसांत भरपाई दिली जाईल. तसेच हत्तींच्या कळपाला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. हत्ती दिसल्यास वन कर्मचायांना वेळीच माहिती द्यावी.
राकेश मडावी, वनपरिक्षेत्र अधिकारी, पोर्ला
हत्तीचे पोट शेतकऱ्यांनी का भरायचे?
दरम्यान आरमोरी वनपरिक्षेत्रामध्ये गेल्या महिन्याभरापासून रानटी हत्तींनी ठाण मांडले आणि कधी नव्हे असे सुलतानी संकट ओढवले आहे.अख्खे घर रिकामे करून शेतात पेरलेला पैसा व कुटुंबासह शेतात गाळलेला घाम रानटी हत्तीच्या पायदळी तुडवला गेला आहे.
बकारीतील धान्यावर चोरट्याने ताव मारावा, तशी दशा रानटी हत्तीने केल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू डोळ्यात आहेत. जहाजाएवढ्या हत्तीचे पोट शेतकऱ्यांनीच भरायचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डोंगराएवढ्या दुःखाने शेकडो शेतकरी कुटुंबाचे भविष्य अंधारात आले आहे.
शेतकऱ्याची लेकरं असलेल्या अधिकारी व सत्तेतील नेत्यांना शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेता येईल का, हा प्रश्न जनमानसात आहे. शेती व्यवसायात पूर्णत: कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना किमान हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देऊन त्यांच्यात जराशी नवीन उम्मीद जागृत करता येईल.