Join us

शिवारातल्या तूरीला धुक्याचा फटका, फवारणीला आला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 8:00 PM

अर्धवट असलेल्या शेंगा सुकत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या उमरा परिसरात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सतत धुके पडत असल्याने तुरीच्या शेंगा भरण्याच्या वेळी पीक सुकत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अर्धवट असलेल्या शेंगा सुकत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाला फटका बसला आहे. विविध प्रकारच्या कीटकनाशकाची फवारणी करूनही तुरीचे पीक धुक्यापासून वाचविण्यासाठी शेतकरी अपयशी ठरला आहे. पावसाच्या दडीमुळे खरिपातील सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

तुरीचा खर्च निघणेही झाले कठीण

सुरुवातीपासून शेतकऱ्याला खर्च जास्त करावा लागला आहे. ऐन तुरीचे पीक चांगले दिसत असताना मागील महिन्यात अवकाळी पाऊस व सतत पडत असलेल्या धुक्यामुळे तुरीच्या पिकावर खर्च जास्त केला गेला; मात्र धुक्यामुळे तुरीचा फुलोरा व शेंगा पूर्णपणे गळल्या आहेत त्यामुळे तुरीच्या झाडावर शेंगा नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे लावलेला खर्च निघणे कठीण झाले आहे.- अनिल साबळे, शेतकरी उमरा

यावर्षी अवकाळी पाऊस व आता पडत असलेल्या धुक्यामुळे अर्धवट अवस्थेत तुरीच्या शेंगा सुकत असल्याने खरीप हंगामातील सर्वच पिके शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेली आहेत. त्यामुळे शेतीला लावलेला खर्च निघणे कठीण झाले आहे.- प्रवीण इंगळे, शेतकरी उमरा

पीक उत्पादन वाढीसाठी पिकांवर अन्नद्रव्यांची फवारणी फायदेशीर

धुक्यामुळे तुरीचे नुकसान

उमरा मंडळात आधीच अपुरा पाऊस खरीप हंगामातील सर्वच पिके हातातून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार तुरीच्या पिकावर होती. आता धुक्यामुळे तुरीचे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. - संदीप बेराड, शेतकरी उमरा

टॅग्स :तुरापीकहवामान