अस्मानी संकटे, विविध रोगांचा प्रादुर्भाव अशा एकापाठोपाठ एक संकटात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. अशात तालुक्यात शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्याची आशा डोळ्यासमोर ठेवून फुलांचे उत्पादन कष्टाने मिळवले. परंतु ऐन लग्नसराईत फुलांचे बाजार पडल्याने शेतकऱ्यांची चोहोबाजूंनी कोंडी झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना विक्रीसाठी नेलेली फुले फेकून देण्याची वेळ आली आहे. तालुक्यात अनेकांनी तोडणी खर्च परवडत नसल्याने फुलांचे मळे आहेत तसे सोडून दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी महाशिवरात्री, व्हॅलेंटाईन डे यांसह लग्नसराई व होळी, गुढीपाडवा, रामनवमी असे लागोपाठ सण येत आहेत. परंतु या सणांच्या व लग्न समारंभाच्या तोंडावर सर्वच प्रकारच्या फुलांचे दर घसरले आहेत. गुलाब, काकडा या फुलांना दहा ते पंधरा रुपये किलोचा दर मिळणे अवघड झाले आहे. भर उन्हाळ्यात केलेली मशागत, नर्सरीतून आणलेली रोपे, तीनशे ते चारशे रुपये लागवडीची मजुरी, तीन महिन्यांत वेळोवेळी खते, औषधे वापरून एकरी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च शेतकऱ्यांचा झाला आहे.
दोन पैसे मिळतील असे वाटत होते. तेव्हाच फुलांचे बाजार कोसळले तालुका फुलशेतीसाठी ओळखला जातो. विविध गावांतील फूल उत्पादक शेतकरी, उत्तम दर्जाची फुले विक्रीसाठी मुदखेड, नांदेड, निझामाबाद, छिंदवाडा (मध्यप्रदेश), सिकंदराबाद, मुंबई आदी बाजारपेठेत विक्रीसाठी नेतात. उत्पादन वाढल्याने बाजारपेठेत फुलांची आवक वाढली आहे.
प्लास्टिक फुलांचा वापर शेतकऱ्यांच्या मुळावर
● बाजारात सध्या प्लास्टिक व चायनीज फुलांची मोठी आवक आहे. ही प्लास्टिक चायनीज फुले खूपच आकर्षक असून ती कधीच सुकत नाहीत. ठरावीक दिवसांनी धुतली की पुन्हा नवीन प्रमाणे दिसतात.
● नांदेड येथील बाजारात काकडा ३० रुपये, मोगरा ५०, गुलाब २०, चमेली १५ ते २०, गलांडा १० ते १५ रुपये किलोने फुलांचा भाव आहे.
पारंपारिक पिकांना भाव नाही
पारंपरिक पिकांना भाव नाही, म्हणून फुल शेती केली पण बाजारपेठेत फुलांचा वाहतुकीचा खर्च ही निघत नाही. त्यामुळे फुले तोडणीअभावी झाडालाच आहेत. -गंगाधर चंदलवाड, मेंडका, फूल उत्पादक शेतकरी