पीएम किसान सन्मान योजनेशी संबंधित शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. १३वा हप्ता खात्यात जमा झाल्यानंतर आता अनेक शेतकऱ्यांना पुढचा, म्हणजेच १४ वा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात काही कारणाने १३ वा हप्ता जमा झालेला नव्हता, त्यांना १३ आणि १४ वा हप्ता एकत्रच मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच त्यांच्या खात्यात एकूण चार हजार रुपये जमा होऊ शकतील.
पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना २७ फेब्रुवारी रोजी मिळाला होता. हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पाठवण्यात आला. याचे वैशिष्ट्य म्हणजे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तो देण्यात आला होता. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये थेट ट्रान्सफर करते.
कधी मिळणार १४ वा हप्ता ?
काही माध्यमांतील माहितीनुसार १४ वा हप्ता केंद्र सरकार जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करू शकते. असे असले तरी केंद्र सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
तर मिळणार नाही पैसे
ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, ते शेतकरी पी्एम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. कारण नियमांनुसार योजनेशी संबंधित सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. याशिवाय ज्यांनी सातबाराची व जमिनीची पडताळणी केलेली नाही, ते शेतकरीही लाभापासून वंचित राहू शकतात.
ई-केवायसी अशी करा
१. यासाठी तुम्ही प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
२. उजव्या बाजूला तुम्हाला असे टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला eKYC लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा
३. आता तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा
४. आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर एंटर करा आणि OTP टाका
५. जर सर्व काही ठीक झाले तर eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid येईल.
६. असे झाल्यास तुमचा हप्ता उशीर होऊ शकतो. तुम्ही ते आधार सेवा केंद्रावर दुरुस्त करून घेऊ शकता.