Join us

राज्यभरातील धरणांची पाणी पातळी वाढली, धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By मुक्ता सरदेशमुख | Published: July 27, 2023 2:07 PM

राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहत आहेत. 

राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढत असून  धरण पाणलोटात संततधार सुरू आहे. राज्यातील अनेक धरणांची पातळी भरत आली असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राज्यभर कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. धरण काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाचा फायदाही झाला असून राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहत आहेत. 

मुंबईतील धरणे तुडुंब

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील धरणे 90 टक्क्यांच्या वर भरली असून नगर मधील बहुतांश धरणे 50 टक्क्यांच्या वर भरली आहेत.  सतत सुरू असलेल्या पावसामुळे बारावी धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून तानसा,भातसा धरण काठोकाठ भरल्याने या भागातील पाणी प्रश्न मिटला आहे.

पुण्यातील धरणांची स्थिती काय?

पुण्यातील खडकवासला धरण 96.17% भरले असून पानशेत 73.25% मुळशी 68% पवना धरण 73.60% भरले आहे. कोयना धरण 60.97% भरले असून दूधगंगा 56.35%, तर उजनी धरण 47.34 टक्क्यांनी भरले आहे. 

राधानगरी धरण काठोकाठ भरले

कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी कमालीची वाढली असून राधानगरी धरण 99.25% भरले आहे. राधानगरी धरणाचे काल 26 जुलै 2023 रोजी 5 स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर भोगावती नदीतून 8540 क्यूसेक पाण्याचा प्रवाह पंचगंगा नदीच्या दिशेने सुरू आहे.

नागपूर विभागात ऊर्ध्व वर्धा धरण 73.71% भरले असून तोतडोह धरण 81.6% भरले आहे.

गोदावरी खोऱ्यातील गंगापूर धरण समूहात मागील वर्षाच्या तुलनेत पाण्यासाठी कमी आहे. परिणामी नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण साठा निम्म्यावर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मराठवाड्यातील धरणे किती भरली?

मराठवाड्यातील जायकवाडी धरण 46.86% भरले असून येलदरी धरण  59.35%   तेरणा, मांजरा, दुधना धरणे 20 टक्क्यांच्या पुढे भरली आहेत. माजलगाव १६.२८%, पेनगंगा(ईसापुर) ५९.४९% , तेरणा २९.३६%, मांजरा २४.४८% ,दुधना २७.८७%, विष्णुपुरी ३.२७%  धरणे भरली आहेत. 

नगरमधील भंडारदरा धरण 83.51% भरले आहे. आजपर्यंत धरणात 6 हजार 964 दशलक्ष घनफुट पाणीसाठा होता. त्यात आजच्या पावसामुळे 273 दशलक्ष घनफुट पाण्याची आवक झाली आहे.  गंगापूर मधील दारणा 77.94% भरले आहे. तसेच कोयना धरण 60.97% भरले आहे.

टॅग्स :धरणमोसमी पाऊसपाऊसपाणीमहाराष्ट्रमराठवाडाशेतकरी