जिजाबराव वाघ
बंधाऱ्यांचे खोलीकरण, उपसलेला गाळ शेतीमातीत टाकणे आणि जलसमृद्धीच्या धारेने दुष्काळाचा डाग पुसणे, या ध्येयातून जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावात सुरू झालेल्या मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा चळवळीच्या क्रांतीची ज्योत उत्तर महाराष्ट्रातील ७१ गावांमध्ये प्रज्वलित झाली आहे.
या गावांमध्ये २८३ कोटी लिटर जलसाठा खळाळला आहे. राज्यभरातील २१० गावांमध्ये 'पाणी बचती'चा चाळीसगाव पॅटर्न राबवला जात आहे.
केंद्रीय आयकर विभागातील उपायुक्त पदातून स्वेच्छा निवृत्ती घेत डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण यांच्या पुढाकाराने ही चळवळ गावखेड्यांमध्ये रुजत आहे. सात वर्षांपूर्वी २०१८ मध्ये गावखेड्यांची दुष्काळाने होणारी होरपळ पाणी बचतीची फुंकर मारून थांबवावी.
या उद्देशाने मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा चळवळीस प्रारंभ झाला. गत सात वर्षात 'काळ्या भुईची भरलेल्या आभाळासोबत गळाभेट' घडवत गावकऱ्यांनी दुष्काळाच्या साखळ्या तोडून टाकल्या.
१५ कोटी लिटर जलसाठा खळाळला
१. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, भडगाव, पारोळा, एरंडोल आणि अमळनेर या तालुक्यातील ६१ गावांमध्ये गेल्या सात वर्षांत २२५ कोटी लिटर जलसाठा झाला आहे. बंधाऱ्यांमधील गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य दिला जातो. यातून जमिनीची सुपीकता वाढायला मदत होत आहे.
२. अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा, सावरगाव घुले या दोन गावांमध्ये बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन करताना येथे १५ कोटी लिटर जलसाठा खळाळला आहे.
३. धुळे जिल्ह्यातील बोरविहीर, कापडणे, निमगूळ व बाबरे यांचा चार गावांमध्ये गेल्या दोन वर्षांत पाणी बचतीसाठी प्रायोगिक काम झाले. येथे २३ कोटी लिटर जलसाठा साठविला गेला आहे. यामुळे शेतातील उत्पादन वाढले आहे. दुष्काळाच्या जोखडातून शेतकऱ्यांची मुक्तता होऊ लागली आहे.
४. नाशिक जिल्ह्यातील पोखरी, न्यायडोंगरी, लासलगाव शास्रीबंधारा, जातेगाव यागावांमध्ये २० कोटी लिटर जलसाठ्याने दुष्काळाचे मळभ हटविले आहे.
दुष्काळमुक्तीचा हा लढा अधिक गतीने पुढे नेणार आहोत. सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांमधील २१० गावांमध्ये जल चळवळीचे काम सुरू आहे. - डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण, प्रमुख, मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा टीम, चाळीसगाव.
शासनाचा छदामही नाही
या चळवळीने शासनाची मदत न घेता राज्यभरातील १२ सामाजिक संघटनांनी यात सहभाग दिला आहे. जैन संघटना, नाम फाउंडेशन, रोटरी क्लब चेंबूरसह पनवेल व ठाणे वेस्ट या चळवळीशी जोडले गेले आहेत. सद्य:स्थितीत राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये ही जलबचतीची दिंडी पोहचली आहे. तर २१० गावांनी शेती समृद्धीचा जयघोष केला आहे.
भेगाळ मातीच्या डोळ्यांत जागवली आस
• धामणगाव (ता. चाळीसगाव) येथे पहिल्यांदा या चळवळीने दुष्काळाविरुद्ध एल्गार पुकारला.
• विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार वगळता धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्यांतील ७१ गावांनी पाणी बचतीची गुढी बांधली.
• या गावांमध्ये २८३ कोटी लिटर जलसाठ्याने हजारो हेक्टर शेतशिवाराला हिरवा साज मिळाला आहे.
• चळवळीने दुष्काळ आणि आग ओकणाऱ्या वणव्याने भेगाळलेल्या शेतीमातीची जलसाठ्याने ओटीच भरली आहे.
स्वयंसेवकांची साखळी
बारोमास पाण्यासाठी संघर्ष करणारी गावे 'पाणीदार' झाली. राज्यभरात अडीच हजार 'जलप्रहरी' स्वयंसेवकांची साखळी जोडली गेली असून, हजारो शेतकऱ्यांनी पाणी बचतीचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. या चळवळीद्वारे बंधाऱ्यांसह नाला खोलीकरण व नद्यांचे पुनरुज्जीवनाचे प्रयोगही यशस्वी झाले आहेत.