पालघर : राज्यात प्रसिद्ध, जागतिक मानांकन प्राप्त आणि लाखोंची उलाढाल असलेल्या बहाडोलीच्या टपोऱ्या काळ्या जांभळांना यंदा लहरी हवामानाचा फटका बसला आहे. एप्रिल महिन्यात बाजारात उपलब्ध होणारी ही जांभळे यंदा मे महिना संपत आला तरी कच्च्या स्वरूपात झाडावर लटकत आहेत.
पावसाळा तोंडावर असताना फळ पिकण्याआधीच पाऊस सुरू झाल्यास पत घसरण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. दरवर्षी एप्रिल, मे, जून या महिन्यांमध्ये कमीत कमी दोन ते तीन वेळा जांभळाच्या झाडांना बहर येतो.
साधारण १५ एप्रिलनंतर जांभळे काढण्यास शेतकरी सुरुवात करतात आणि ती खवय्यांसाठी बाजारात दाखल होतात. मात्र, यावर्षी अति उष्णतेमुळे व वळवाचा पाऊस अशा बदलत्या वातावरणामुळे जांभळाचे पीक उशिरा येत आहे. मे महिना संपत आला तरी कच्ची जांभळे आहेत. अजून १२-१५ दिवसांनंतर हे पीक शेतकऱ्यांच्या हाती लागणार आहे.
शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
- एप्रिलमध्ये जांभळाला बाजार चांगला असतो पाऊस पडला की जांभळाचा बाजार कमी होतो. पावसानंतर नागरिक सहसा जांभळा खात नाहीत. यावर्षी पावसाळासुद्धा जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता असल्याने व पहिला बहर जांभळाला त्याच काळात येणार असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
- जे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, त्या कुटुंबाला या झाडांचा मोठा आधार असतो. जांभळे विकून आलेल्या पैशातून हे शेतकरी मीठ मसाला व इतर किराणा वस्तू विकत घेऊन ठेवतात. यावर्षी अजूनपर्यंत जांभूळच उपलब्ध न झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
- बहाडोली येथे साधारण फळ देणारी एक हजार झाडे आहेत. लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या या जांभळाला यंदा वेळेत बहर न आल्यामुळे शेतकरी राजा आर्थिक गर्तेत सापडला आहे.
शहरात ८०० रुपयांचा दर
• पालघर, विरार, वसई, डहाणू, बोरीवली, अंधेरी, दादर या भागातील व्यापारी इथली जांभळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बहाडोलीला येत असतात.
• मुंबईसारख्या ठिकाणी किलोमागे ७०० ते ८०० रुपये दराने ही जांभळे विकली जातात. शेतकऱ्यांना एका झाडापासून साधारण ३० ते ४० हजार रुपये उत्पन्न मिळायचे. झाडाला कमी बहर असेल तर दहा ते पंधरा हजार रुपये उत्पन्न हमखास मिळत होते.
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात उपलब्ध होणाऱ्या जांभळांना यावर्षी अति उष्णतेचा व लहरी हवामानाचा फटका बसला आहे. त्यामुळे जांभळावर उदरनिर्वाह असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. - तुकाराम किणी, शेतकरी
अधिक वाचा: Paddy Nursery भाताच्या सशक्त रोपांसाठी कशी तयार कराल रोपवाटीका