बियाणे आणण्यासाठी अकोटहून यवतमाळला निघालेल्या तरूणाचा अपघाती मृत्यू झाला. राँगसाइडने आलेल्या कारने दुसऱ्या एका कारला समोरासमोर धडक दिली. या अपघातात कारमधील एक तरुण जागीच ठार झाला. २९ मे रोजी सकाळी १०:३०च्या सुमारास अमरावती चांदूर रेल्वेमार्गावरील वाघामाय माता मंदिराजवळील घाटात हा अपघात घडला, योगेश हरिभाऊ गावंडे (३२, रा. मरोडा, ता. अकोट, जि. अकोला) असे मृताचे नाव आहे. युवक अकोटहून यवतमाळला बियाणे आणण्यासाठी गेला असता दुर्देवी अपघात घडला.
या अपघातात अक्षय विठ्ठलराव गावंडे (२७), शुभम गणेशराव गावंडे, चेतन अजय गावंडे व महेश गजानन गावंडे (सर्व रा. मरोडा) हे जखमी झाले. अक्षरा गातंदे टा गातातील चौघांना सोबत घेऊन बुधवारी कारने (क्र. एमएच ३७ व्ही ११७६) मरोडा येथून यवतमाळ येथे बी-बियाणे खरेदी करण्याकरिता अमरावती ते चांदूर रेल्वेमार्गाने जात होता. ते वाघामाय माता मंदिराजवळील घाटात असताना सकाळी १०:३०च्या सुमारास चांदूर रेल्लेकडून आलेल्या कारने (MH१४ केजे १४८४) गावंडे चालवित असलेल्या कारला राँगसाइड भरधाव वेगात येऊन धडक दिली. त्यात योगेश गावंडे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तथा जखमींना रुग्णालयात हलविले.
एकाचा पाय जायबंदी
या अपघातात चालकमालक अक्षय गावंडे याच्या दोन्ही पायाला, डोक्याला जखमा झाल्या आहेत. तर शुभम गावंडे याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी अक्षय गावंडे याच्या तक्रारीवरून फ्रेजपूरा पोलिसांनी कारचालक सुहास ज्ञानेश्वर कळंबे याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.