पावसाचे पडणारे पाणी माण नदीपात्रातून जमिनीत मुरावे, पर्क्युलेशन वाढून आसपासच्या विहिरी, बोअरला पाणी वाढावे, या उद्देशाने माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणचे माण नदीपात्र नांगरणे किंवा मोठ्या ट्रॅक्टरने फणकाटी मारण्याचे काम सुरू केल्याचे माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांनी सांगितले.
सन २०१५ साली माण नदीपात्र नांगरल्याचा प्रयोग केला होता. त्यावेळी वाढेगाव बंधाऱ्यातील नदीपात्रात ८ ते १३ फूट उंचीचा गाळ असल्यामुळे त्यावेळची नांगरट फारशी उपयुक्त ठरली नव्हती. सन २०१६ व २०१७ मध्ये माण नदीपात्रातील संपूर्ण गाळ काढला होता.
त्याखाली फक्त वाळूचे थर शिल्लक राहिले होते. नंतरच्या चार पाच वर्षांत पावसाच्या पाण्याने वाळूच्या थरावर गाळाचे थर साचल्यामुळे गाळ आणि वाळू मिश्रण झाले की सिमेंट काँक्रीट प्रमाणे घट्ट थर तयार होतात.
त्यामुळे पावसाचे पाणी आले तरी ते वरच्या वर वाहून जाते. घट्ट थरामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. तसेच पर्क्युलेशन पूर्णपणे बंद पडल्यामुळे आसपासच्या विहिरी, बोअरला नदीतून पाणी जात नाही.
त्यासाठी नदी पात्रावरील पृष्ठभाग भुसभुशीत करून त्यावरील वाळू मातीचा घट्ट झालेला थर काढणे आवश्यक असल्याने नदीपात्र नांगरण्यास सुरुवात केल्याचे अध्यक्ष घोंगडे यांनी सांगितले.
संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले.. - नदीपात्र नांगरण्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना चार महिन्यांपूर्वीच पत्राद्वारे कळविले आहे. 'शक्य असेल तिथे नदी नांगरा' हा व्हॉट्सअॅप मेसेज वैयक्तिक व ग्रुपवर टाकून अनेकांनी माहिती पुरवली. त्यातूनही आम्हाला प्रेरणा मिळाली.- नदी नांगरणी अभियान आम्ही सुरू करत आहोत. त्यामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी संस्थेशी संपर्क साधून सहकार्य करावे. या कामासाठी दिली जाणारी देणगी कर सवलत पात्र रक्कम असणार आहे, असे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे म्हणाले.