सोलापूर : पावसाळ्यात शिवाय परतीचा पाऊस चांगला पडल्याने यंदा रब्बी हंगामातील पेरणीवर कमालीचा परिणाम झाला आहे. ऑक्टोबर महिना संपत आला, तरी केवळ १५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीपेरणी झाली आहे.
दरम्यान यंदा ज्वारीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती.
पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले असताना शेतात पाणी कोठून येणार?, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे बागायती विशेषता ऊस क्षेत्राला मोठा फटका बसला होता. ऊस क्षेत्र कमी झाले अन् जून महिन्यापासून सलग चांगला पाऊस पडत गेल्याने खरीप क्षेत्रात मोठी वाढ झाली.
खरीप पिकांची काढणी करून ऊस, रब्बी हंगामातील किंवा इतर पिके घेण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे, मात्र सततच्या पावसामुळे जमिनीत वापसा झाला नाही त्यामळे ज्वारी पेरणी करता आली नाही.
अनेक ठिकाणची खरीप पीके निघाल्याने रान रिकामे झाले असले, तरी वापसा आला नसल्याने मशागत करून ज्वारी पेरणी करता आली नाही. आतापर्यंत जिल्ह्यात अवघ्या १५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पेरणी झाली असून, पावसामुळे त्याची चांगली उगवण होण्याची शक्यता कमीच आहे.
ज्वारी पेरणीचा कालावधी निघून गेल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागांत ज्वारी पेरणी करणे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.
चित्रा नक्षत्रातही पडतोय पाऊस■ सध्या चित्रा नक्षत्र सुरू असून, वाहन पर्जन्यसूचक म्हैस आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडलाच शिवाय चित्रा नक्षत्रातही परतीचा पाऊस पडत आहे. मागील तीन दिवसांत जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सगळीकडेच पाऊस पडला आहे.■ जिल्हात रब्बीची २३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, त्यामध्ये ज्वारीची १५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक चार हजार, सांगोला तालुक्यात साडेतीन हजार हेक्टर, करमाळ्यात अडीच, दक्षिण तालुक्यात दीड, मोहोळ तालुक्यात एक हजार हेक्टर क्षेत्रावर इतर तालुक्यांत पाचशे ते तीनशे हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पेरणी झाली आहे.■ मका, हरभरा, गहू व इतर पिकांची आठ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची नोंद कृषी खात्याकडे झाली आहे.■ ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात एकूण ९३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ६२ मिमी म्हणजे ६७ टक्के इतका पाऊस पडला आहे. माढा तालुक्यात सर्वाधिक ९५ मिमी, माळशिरस तालुक्यात ७१ मिमी, पंढरपूर, करमाळा, अक्कलकोट व उत्तर तालुक्यात प्रत्येकी ६५ मिमी पाऊस पडला आहे. इतर तालुक्यांत यापेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.