Join us

ज्वारीची भाकरी खाणाऱ्यामध्येही मोठी भर पण पेरणीत मात्र मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 3:37 PM

गेल्या काही वर्षांपासून खरिपातील ज्वारीच्या पेरणीत मोठी घट झाल्याचे चित्र कवठेमहांकाळ तालुक्यात दिसत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक पेरा हा ज्वारीचाच होत होता.

जालिंदर शिंदेघाटनांद्रे : पिकविले तर त्याला भाव मिळेलच याची कोणतीही शाश्वती नाही. त्यात काढणीसाठी मजुराची नकारघंटा, कापणी, खुडणी केली तर अंगाला खाज सुटते अशा मजुरांच्या तक्रारी, सोबतच काढणीच्या वेळेस जर पाऊस आलाच तर ज्वारी काळी पडून मातीमोल दराने विकावी लागते.

याच कारणाने गेल्या काही वर्षांपासून खरिपातील ज्वारीच्यापेरणीत मोठी घट झाल्याचे चित्र कवठेमहांकाळ तालुक्यात दिसत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक पेरा हा ज्वारीचाच होत होता. गावागावांतील शेतकऱ्यांच्या घरात ज्वारीच्या पोत्यांच्या राशीच्या राशी दिसून येत होत्या.

आर्थिक अडचण आल्यास किंवा पेरणीच्या वेळी हीच साठवणूक केलेली ज्वारी बाजारात विक्रीला नेऊन शेतकरी आपली गरज भागवत होते. पण सध्या काळ बदलला आहे. लोक खरीपातसुद्धा नगदी उडीद, सोयाबीन, भुईमूग, मका पिकासह द्राक्षासारख्या इतर फळ शेतीकडे वळले आहेत.

शेतकऱ्यांनी ज्वारी सोडून इतर पिकांकडेच आपला मोर्चा वळवल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तालुक्यात हजारो हेक्टर पेरणी होत असलेली ज्वारी २०२४-२५ च्या खरीप हंगामात एकूण २४ हजार ३८७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र तीन १३ हेक्टर इतके आहे.

२०२४-२०२५ चालू खरीप हंगामात ज्वारी केवळ ४२६ हेक्टरवर पेरल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. सध्या आहारात ज्वारीचे महत्त्व वाढले आहे. ज्वारीची भाकरी खाणाऱ्यामध्येही मोठी भर पडली आहे.

असे असताना शेतकऱ्यांना ज्वारी पेरणीकडे दुर्लक्ष केले आहे. मजुराची अडचण, काढणीच्या वेळेस पाऊस झाला तर ज्वारी काळी पडण्याची भीती या व अशा अनेक कारणांमुळे खरिपातील ज्वारी पिकाचे प्रमाण कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

रब्बीमध्ये ज्वारीला शेतकऱ्यांची पसंतीकवठेमहांकाळ तालुक्याचे पेरणी क्षेत्र एकूण २४३८७ हेक्टर इतके असून, त्यापैकी केवळ ४२६ हेक्टरवर यावर्षी संकरित ज्वारीची पेरणी झाली आहे. कधीकाळी तालुक्यात सर्वाधिक पेरणी ही ज्वारीची असायची, तो पेरा कमालीचा घटला आहे. आता मात्र कुठे रब्बीमध्ये या ज्वारीला शेतकरी पसंती देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

खरिपात हायब्रीड ज्वारी घेतल्यास धान्यासोबत कडबा पण मिळतो. मात्र, गेल्या काही वर्षापासून या पिकाचर खरिपात रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. कापणीच्या वेळेस पाऊस आला तर ज्वारी खराब होते. म्हणून शेतकरी ज्वारी पेरणीकडे दुर्लक्ष करत आहे. - प्रल्हाद हाक्के, शेतकरी, गर्जेवाडी

टॅग्स :ज्वारीपेरणीशेतकरीशेतीपीकखरीपरब्बीतासगाव-कवठेमहांकाळ