पुणे : राज्यभरातील शेतरस्ते म्हणजे शेतीसाठी संजीवनीच असते. पण पाणंद रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे शेतकऱ्यांचा शेताशी जवळपास सहा महिने संपर्क तुटत आहे. पावसाळ्याचे चार महिने आणि त्यापुढील दोन महिने शेतकर्यांना शेतात जाताच येत नसल्यामुळे पिकपद्धतीत बदल करता येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, राज्यातील प्रत्येक शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ता, शिवरस्ता आणि शेतरस्त्याची तजवीज करण्यात आलेली आहे. पण या रस्त्यावर पावसाळ्याच्या संपूर्ण दिवसांत चिखल असतो. तर सध्याच्या हवामान बदलामुळे पावसाळा काही दिवासांनी पुढे सरकल्याचे दिसत आहे. त्यामुळे डिसेंबरच्या महिन्यापर्यंत शेताच्या रस्त्यावर चिखल असतो.
चिखल असल्यामुळे या काळात शेतामध्ये बैलगाडी अथवा गाडी नेता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा या काळात कोणताच संपर्क नसतो. म्हणून सोयाबीन सारख्या एकदाच काढल्या जाणाऱ्या पिकांची पेरणी केल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नसतो.
राज्यात पाणंद रस्त्यांसाठी सरकारने योजना सुरू केली असून या माध्यमातून पाणंद रस्त्याची डागडुजी करून मुरूम टाकला जाऊ शकतो. पण शेतकऱ्यांना अजूनही याची प्रतिक्षाच आहे. जून ते डिसेंबर दरम्यान काढणीसाठी येणाऱ्या फळपिकांची, भाजीपाला पिकांची लागवड या क्षेत्रामध्ये करता येत नसल्यामुळे खऱ्या अर्थाने शेती वंचितच राहिली आहे.