भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : महसूल विभागाच्या ई-चावडींतर्गत जिल्ह्यातील शेतसारा आकारणी आणि वसुलीची व्यवस्था ऑनलाइन होणार आहे. यासाठी आवश्यक शेती, शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
ऑनलाइनमुळे शेतसारा वसुलीत अचूकता, पारदर्शकता, सुलभता येणार आहे. एका क्लिकवर शेतसारा थकीत शेतकऱ्यांची माहिती मंत्रालय पातळीपर्यंत कळणार आहे. परिणामी शेतसारा वसुलीत कमी असणाऱ्या जिल्ह्याला काटेकोर वसुली करावी लागणार आहे.
प्रत्येक वर्षी मार्चअखेर शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल केला जातो. याशिवाय बिगरशेती, जमिनीच्या वर्ग बदलाचे शुल्क, शासन जमीन वाटपातून मिळणारे शुल्क महसूल प्रशासनाकडून वसूल केले जाते.
सध्या गावपातळीवर कोतवाल, तलाठी, सर्कल यांच्याकडून शेतसारा वसूल केला जातो. यामध्ये तलाठी, सर्कल सांगतील तितके पैसे शेतकरी देतात. एकदा पैसे दिल्यानंतर परत त्याची पावती घेण्याकडेही अनेक शेतकरी दुर्लक्ष करतात.
परिणामी शासनाकडून अपल्या शेतीसाठी किती शेतसारा आकारला जातो, हे वर्षानुवर्षे अनेक शेतकऱ्यांना माहीत नसते. दैनंदिन शेतीच्या व्यस्त जीवनशैलीतून खोलात जाऊन याची माहितीही घेतली जात नाही.
पण, ऑनलाइन व्यवस्थेमुळे जितकी शेती त्यानुसारच्या शेतसाऱ्याची पावतीच येणार आहे. ती घेऊन चलन काढून बँकेत भरावी लागणार आहे. यामुळे कोतवाल, तलाठी, सर्कल यांच्याकडे शेतसाऱ्याचे पैसे देण्याची पारंपरिक पद्धतच बंद होणार आहे.
शेतसारा पाचशे रुपये आणि घ्यायचे एक हजार रुपये, अशा प्रवृत्तीलाही चाप लागणार आहे. राजकीय वजन वापरून वर्षानुवर्षे शेतसारा भरणे टाळणाऱ्यांनाही एका क्लिकमध्ये सहजपणे शोधणे शक्य होणार आहे.
कर, शुल्क आकारणीत ऑनलाइनमुळे पारदर्शकता येणार आहे. शेतकऱ्याने जितके पैसे भरले तितके सर्व शासनाच्या तिजोरीतच जमा होणार आहेत.
कोठूनही शेतसारा भरता येणार
• ऑनलाइनमुळे शेतकरी कोठेही असला, तरी त्याला आपला शेतसारा ऑनलाइन भरता येणार आहे. शेतसारा भरण्यासाठी गावाकडे येऊन तलाठी, कोतवालला शोधण्याची गरज भासणार नाही.
• अल्पशिक्षणामुळे काही शेतकऱ्यांना ऑनलाइन शेतसारा भरणे शक्य होणार नाही. अशांसाठी ऑफलाइनही कर भरून घेण्याची व्यवस्था काही दिवस असणार आहे.
महसूल कर वसुलीत जिल्हा राज्यात अग्रेसर
राज्यात नेहमी महसूल कर वसुलीत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहिला आहे. गेल्या आर्थिक वर्षात ६० कोटींचे उद्दिष्ट होते मात्र, प्रत्यक्षात १३९ कोटींचा महसुली कर संकलित झाला होता. यंदाही चांगली वसुली होईल, असा महसूल प्रशासनाचा दावा आहे.
ई-चावडीतर्गत शेतसारा वसुली, आकारणी ऑनलाइन करण्यात येणार आहे. यासाठीची माहिती संकलित केली जात आहे. - संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी, महसूल कोल्हापूर
अधिक वाचा: Jamin Mojani : जमीन मोजणीच्या प्रकारात मोठे बदल; आता मोजणी होणार फक्त इतक्या दिवसात