आता पीक पेऱ्याची नोंद शेतकऱ्यांना मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन करावी लागत आहे. यासाठी अनेक ठिकाणी नेटचा खोडा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कसरत होत आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत १.१६ लाख म्हणजेच २३ टक्केच शेतकऱ्यांनी ऑनलाइन पीकपेरा नोंदविलेला आहे. त्यामुळे ४.७० लाख शेतकरी ऑनलाइन पीकपेऱ्यापासून सध्या दूर असल्याचे दिसून येते.
सुरुवातीला महिनाभर पावसाचा विलंब लागला. त्यानंतर १ जुलैपासून ई-पीक पाहणी सुरू झाली असली, तरी ५ जुलैपासून सुरू झालेला पाऊस जुलैअखेरपर्यंत सातत्याने सुरू होता. त्यामुळे ऑनलाइन पीक नोंदणीची प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू झाली. सातत्याने नेटवर्कचा खोडा येत असल्याने सद्य:स्थितीत २४ टक्केच शेतकऱ्यांनी अशाप्रकारे नोंद केलेली आहे. जिल्ह्यात ५.१३ लाख शेतकरी खातेदार आहेत.
त्या तुलनेत १.१६ लाख शेतकऱ्यांनी व १६९७ खातेदारांची तलाठ्यांद्वारा ऑनलाइन पीक नोंद करण्यात आली. या दोन्हींमध्ये १.८० लाख हेक्टर शेती पिकांची अॅपद्वारे नोंद घेण्यात आली. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत शेतकऱ्यांची लगबग वाढली असताना सातत्याने नेटवर्कचा खोळंबा होत आहे. योजनेसाठी आता शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पीक पेऱ्याची नोंद करता येणार आहे व तांत्रिक दोष निवारण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
१५ सप्टेंबरनंतर तलाठी करणार नोंद
मोबाइल अॅपद्वारे शेती पिकांची नोंद करण्यासाठी शेतकरी खातेदारांना १५ सप्टेंबर ही डेडलाइन देण्यात आली आहे. यामध्ये जे शेतकरी नोंद करू शकले नाही त्यांची नोंद तलाठी यांच्याद्वारा घेण्यात येणार आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरनंतरही खरीप पिकांच्या नोंदी करता येणार आहेत. एका मोबाइलद्वारे ५० खातेदारांची नोंद करता येणे शक्य आहे.
शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत पीकपेयाची ऑनलाइन नोंद करता येते. त्यानंतर राहिलेल्या शेतकऱ्यांची नोंद तलाठी स्तरावर करण्यात येणार आहे. - रणजित भोसले, उपजिल्हाधिकारी (महसूल)