चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूरः केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी २२ लाख टन साखरेचा कोटा खुल्या बाजारात विक्रीसाठी जाहीर केला आहे. यात जुलैमधील शिल्लक दीड लाख टन साखर मिळवल्यास २३ लाख ५० हजार टन साखर खुल्या बाजारात ऑगस्टमध्ये उपलब्ध राहणार आहे.
एक ऑक्टोबरपासून नवा साखर हंगाम सुरू होत असताना देशात ७५ लाख टन साखर शिल्लक असेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. देशातील साखर हंगाम एक ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर असे असतो. चालू वर्षात इथेनॉलकडे वळविलेली २० लाख टन साखर वगळता देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
देशाची गरज २८० लाख टन साखरेची आहे. ही गरज भागविण्यासाठी सरकार दर महिन्याला खुल्या बाजारात विक्रीसाठी कारखानानिहाय साखर कोटा जाहीर करते. ऑगस्ट महिन्यासाठी २२ लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे.
जुलै महिन्यासाठी जाहीर केलेल्या कोट्यातील दीड लाख टन साखर विक्रीविना शिल्लक आहे. ती ऑगस्टमध्ये विकण्याला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे चालू महिन्यात २३ लाख ५० हजार टन साखर विक्रीसाठी बाजारात येणार आहे.
एक ऑगस्ट रोजीच्या आकडेवारीनुसार देशात १२३ लाख टन साखर शिल्लक आहे. यातून २३ लाख ५० हजार टन वजा केल्यास एक सप्टेंबर रोजी देशात ९९ लाख ५० हजार टन साखर शिल्लक असेल, सणासुदीचा हंगाम सुरू होत असल्याने सप्टेंबर महिन्यासाठी २४ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा विक्रीसाठी जाहीर केला जाईल, असा अंदाज आहे.
९९.५० लाख टनातून ही साखर वजा केल्यास एक ऑक्टोबर रोजी देशात ७५ लाख टन साखर शिल्लक असेल. नव्या हंगामापूर्वी दोन महिन्याला पुरेल इतकी म्हणजेच सुमारे ६० लाख टन साखर शिल्लक असणे आवश्यक असते. त्यापेक्षा १५ लाख टन जादा साखर शिल्लक राहणार आहे.
नव्या हंगामात देशात ३३० लाख टन साखरेचे उत्पादन होईल. यात इथेनॉलकडे वळवलेल्या साखरेचाही समावेश असेल. ऑल इंडिया शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) हा अंदाज वर्तविला आहे.
देशातील उपलब्ध साखर आणि ऑगस्ट, सप्टेंबरचा कोटा विचारात घेता नवा हंगाम सुरू होण्यापूर्वी देशात ७५ लाख टन साखर शिल्लक असेल. - प्रफुल्ल विठलानी, साखर उद्योगातील तज्ज्ञ आणि व्यापारी
अधिक वाचा: राज्यातील निवडक ११ साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी