भूमी अभिलेख विभागाने शेतजमिनीच्या एकाच सर्वे क्रमांकातील पोटहिशांच्या मोजणीत एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी करून सुसूत्रता आणली आहे.
मोजणी करताना शेजारच्या जमीनमालकांना देण्यात येणाऱ्या नोटिशीची पोहच, ज्या जागेची मोजणी करावयाची आहे, त्यावर मोजणी संदर्भातील फलक, नकाशा तयार झाल्यानंतर चावडीवर दहा दिवस त्याची प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
तसेच जीआयएस पोर्टलवर अपलोड करण्याचे बंधन या तरतुदींमुळे मोजणीत पारदर्शकता येऊन जमीनमालकांचे हितरक्षण होणार आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९६९ नुसार भूमापन क्रमांकाची उपविभागात विभागणी मोजणी, त्यावरील आकारणी तसेच खर्चाची वसुली यासाठी पोटहिस्सा मोजणीचे नियम ठरवण्यात आले आहेत.
यासंदर्भात भूमी अभिलेख विभागाने वेळोवेळी परिस्थितीजन्य मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. एकाच सर्वे, हिस्सा, गट क्रमांकाच्या सातबाराधारकांची संख्या जास्त असल्याने व त्यांचे नकाशे स्वतंत्र नसल्याने मोजणी वेळी हद्द व क्षेत्राबाबत वाद निर्माण होतात.
हे वाद कमी करण्यासाठी सध्याचे प्रचलित नियम, शासन निर्णय व परिपत्रक यातील तरतुदी विचारात घेऊन मोजणी करण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे भूमी अभिलेख विभागाने ठरविले आहे.
अशा पध्दतीने राबवली जाणार मोजणी प्रक्रिया
१) ज्या पोटहिश्शांची मोजणी करावयाची आहे, त्या शेतकऱ्याने अर्ज करताना स्वतः शेजारील जमीनमालकांची संपूर्ण माहिती अर्जातच देणे बंधनकारक केले आहे.
२) ही माहिती देताना जागेचा कच्चा नकाशा, चतुःसीमेसह द्यावा लागणार आहे. या चतुःसीमेनुसार संबंधित जागेचे शेजारी जागामालक कोण आहेत, हे देखील कळणार आहे.
३) तसेच ज्या जागेची मोजणी करायची आहे, त्या जागेची सत्यता पडताळणी करण्यासाठी खरेदीखत व हक्क संपादनाचा पुरावादेखील द्यावा लागणार आहे, असे सांगण्यात आले. जेणेकरून त्याच जागेची मोजणी केली जात आहे हे त्यातून स्पष्ट होणार आहे.
४) अनेकदा एका जागेची मोजणी करायची असताना दुसरीच जागा दाखविली जाते अशा स्वरूपाची फसवणूक यातून कळणार आहे.
स्पीड पोस्टाने नोटीसा येणार
- या माहितीत देण्यात आलेल्या पत्त्यावर संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे
- ही नोटीस स्पीड पोस्टाद्वारे दिली जाणार असल्याने त्याची पोहच मिळणार आहे.
- ही पोहच मिळाल्यानंतरच मोजणीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
- मोजणीच्या तारखेपूर्वी सात दिवस आधी संबंधित जागेवर मोजणीसाठीचा फलक लावण्याचे बंधन केले आहे.
- या फलकाचा फोटो तारीख व वेळेसह पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुनावणीनंतर निकाल
मोजणी झाल्यानंतर संबंधित जागेचा नकाशा ग्रामपंचायत कार्यालय, तसेच आपली चावडी या पोर्टलवर दहा दिवस अपलोड करावा लागणार आहे. या कालावधीत एखाद्याने आक्षेप घेतल्यास संबंधित अधिकाऱ्याला त्यावर सुनावणी घेऊन निकाल द्यावा लागणार आहे.
अधिक वाचा: Dasta Nondani : नोंदणी झालेल्या दस्तात चूक झाली तर ती कशी दुरुस्त करता येते? वाचा सविस्तर?