खरीप हंगाम २०२४-२५ या वर्षासाठी सोयगाव तालुक्यासाठी १७ हजार ३२२ मेट्रिक टन रासायनिक खताचे आवंटन मंगळवारी मंजूर झाले आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात तालुक्यात खताचा तुटवडा भासणार नाही, अशी माहिती कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी दिली.
यामध्ये सर्वाधिक संयुक्त खत ७ हजार ३८ मेट्रिक टन मंजूर होणार असून युरिया ६ हजार मेट्रिक टन उपलब्ध होणार आहे. आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत शेतकरी गुंतला आहे. त्यामुळे तालुका प्रशासनानेही खरीप हंगाम पूर्वतयारी हाती घेतली आहे. असे असले तरी रासायनिक खतांच्या दरात नुकतीच वाढ झाली आहे.
त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना या वाढीव दराचा फटका बसणार आहे. तसेच आगामी खरिपाच्या हंगामातील खर्चात वाढ होईल, असे मत शेतकऱ्यांना वाटते.
एका कंपनीवर निर्बंध; इतर खतांवर लक्ष
मागील खरीप हंगामात पिकांच्या वाढीच्या काळात सुपर सिंगल फॉस्फेट या खतामुळे कपाशी पिके जळून गेली होती. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले होते; परंतु यंदाच्या खरीप हंगामात सरदार फर्टिलायझर या कंपनीच्या सुपर सिंगल फॉस्फेट खतांवर बंदी घालण्यात आली आहे.
तसेच इतर कंपनीकडून बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या सुपर सिंगल फॉस्फेट खतांवर कृषी विभाग लक्ष ठेवणार असून त्या खतांचे नमुने आधीच तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी सांगितले.
मंजूर खत
युरिया - ६००० मे.टन
डी.ए.पी. - १५१२ मे.टन
एम.ओ.पी. - ३१८ मे.टन
संयुक्त खते - ७०३८ मे.टन
एस.एस.पी. - २४५४ मे.टन
हेही वाचा - शेतकरी बांधवांनो भूक मंदावली, थकवा जाणवतोय; किडनीचा आजार तर जडला नाही ना?