सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत १ जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडण्यात येणार आहेत. सर्वोच्च निकालानुसार आजरोजी बंधाऱ्यात ०.२१९ टीएमसी म्हणजेच ०.६२२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून हे सर्व पाणी तेलंगणात जाणार आहे. त्यामुळे बंधारा कोरडा पडेल की काही पाणीसाठा राहील हे पाहण्याचे महत्त्वाचे आहे.
१ जुलै रोजी सकाळी ९ ते १० च्या दरम्यान पहिले एक गेट उघडण्यात येणार आहे. त्यानंतर बाकीचे तेरा गेट हळूहळू उघडे केले जाणार आहेत. बंधाऱ्यात जमा झालेला पाणीसाठा पूर्ण तेलंगणात जाणार असल्याने याचा लाभ तेथील लोकांना होणार आहे.
पाणीसाठा सोडण्यात येत असला तरी राज्यातील एकही लोकप्रतिनिधी यावर महाराष्ट्राच्या बाजूने न्यायालयात आपले विचार मांडण्यास पुढे येत नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या भागातील नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट ओढावू शकते.
न्यायालयाचा निर्णय
■ १ जुलै रोजी बंधाऱ्याचे दरवाजे उघडणे. २९ ऑक्टोबर रोजी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करणे. १ मार्च रोजी ०.६ टीएमसी पाणी सोडण्यात येणार, असा एक कलमी कार्यक्रम न्यायालयाने ठरवून दिला आहे.
सुरक्षितता धोक्यात
■ बाभळी बंधाऱ्यावर सुरक्षारक्षकाची नेमणूक नसल्यामुळे बंधाऱ्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बंधाऱ्याचे दरवाजे बंद व चालू करण्याच्या वेळेसच विद्युतपुरवठा चालू केला जातो. इतर वेळी मात्र बंधाऱ्यावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
■ बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
हेही वाचा - भारतीयांना वार्षिक किती कांदा लागतो? जाणून घ्या संपूर्ण गणित