पीक विमा मिळण्यासाठी सलग २१ दिवस पावसाचा खंड असावा लागतो, अशी अट विमा कंपनीची आहे. मात्र, अंबाजोगाई तालुक्यात सातपैकी फक्त तीन महसूल मंडळांत पावसाचा खंड दाखविला आहे, तर पाऊस न पडताही इतर चार महसूल मंडळांत कृषी विभागाने पाऊस दाखविल्याने तेथील शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुष्काळात तेरावा महिना अशी बिकट अवस्था या शेतकऱ्यांची झाली आहे.
तालुक्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तुरळक पावसावर पेरण्या झाल्यानंतर आठवडाभर रिमझिम पाऊस झाला. कशीबशी पिके उगवली. मात्र, त्यानंतर सलग २६ दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याची एकमेव आशा आहे.
सुधारित अहवाल पाठवा
कृषी विभागाने शासनाला पाठवलेला चुकीचा अहवाल बदलून पाठवावा. अंबाजोगाई तालुक्यात सर्वच महसूल मंडळांत २६ दिवसांपासून पावसाचा खंड आहे, ही वस्तुस्थिती नमूद करावी. ज्या महसूल मंडळात पर्जन्यमापक यंत्र नाहीत, तिथे ती बसवावीत. चुकीच्या अहवालाची दुरुस्ती न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार आहे. -प्रकाश बोरगावकर, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बीड
कृषी कार्यालय देत नाही आकडेवारी
पावसाची आकडेवारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय देत नाही. ती जिल्ह्यावरूनच तालुक्याला उपलब्ध होते. शासनाने प्रत्येक महसूल मंडळात पर्जन्यमापक बसवलेले आहे.. त्यानुसार बीड येथून ऑटोमेटिक डाटा प्राप्त होतो. खंडित कालावधीचा डाटादेखील जिल्ह्यावरुनच मिळतो. सलग २१ दिवस पावसाचा खंड तालुका कृषी कार्यालय त्यानंतर पडला तर २५ टक्के विम्याची अग्रीम सर्वेक्षणाची कारवाई करते...