सांगली : जिल्हा बँकेने शेती पूरक व्यवसायाला १११ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्हा बँकेने आठ हजार कोटी ठेवी करीत १५ हजार कोटींची उलाढाल केली आहे. शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत शून्य टक्के दराने कर्ज, शेतकरी विमा, शेतीच्या थकीत कर्जासाठी ओटीएस योजना स्वीकारली आहे.
या योजना राज्यातील अन्य बँकांनी स्वीकारल्या आहेत. त्यामुळे राज्यातील पहिल्या पाच बँकांत सांगली जिल्हा बँकांचा समावेश असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.
मानसिंगराव नाईक म्हणाले, पावणेतीन वर्षांपूर्वी अध्यक्षपद घेतल्यापासून शेतकरी, विकास संस्था, अन्य सहकारी संस्था केंद्रबिंदू मानून काम केले आहे. शेतकऱ्यांना सक्षम करून कृषी व ग्रामीण विकास करणे हे उद्दिष्ट आहे.
३१ मार्च २०२४ रोजी जिल्हा बँकेने सात हजार ९०५ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे. सहा हजार ६९६ कोटी कर्जे असून, व्यवसाय १५ हजार कोटींवर पोहोचला आहे. गतवर्षी २०४ कोटी रुपयांचा नफा मिळाला.
शासनाने पीक कर्जाचे एक हजार ६९० कोटीचे टार्गेट दिले होते. मात्र, बँकेने एक हजार ८०७ कोटींचा कर्जपुरवठा केला असून, एक हजार ४९६ कोटी येणे बाकी आहे. केंद्र सरकारने व्याज परतावा रकमेत कपात केली. तरीही बँकेने उर्वरित अर्धा टक्का तोटा सहन करून शेतकऱ्यांना मदत केली.
दुष्काळी परिस्थिती, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करू शकत नाहीत. शेतकरी, बिगर शेतीसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) राबवली. बँकेने नऊ हजार ७८४ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला आहे.
या शेतकऱ्यांना बँकेच्या नफ्यातून ३१.८१ कोटींची सवलत दिली आहे. सभासदांच्या कुटुंबातल्या मुलीच्या लग्नकार्यासाठी तातडीचे ५० हजाराचे कर्ज, शेतकरी कर्जदार मुलीच्या लग्नास १० हजार रुपये भेट देणार आहे. राज्यातील अन्य बँकांनी सांगली जिल्हा बँकेचा पॅटर्न राबवित आहेत.
ई-बँकिंगच्या सुविधा देणारशेतकऱ्यांना अत्यल्प व्याजदराने कर्जपुरवठा उपलब्ध होणाऱ्या केंद्र, राज्य शासन व नाबार्डच्या योजना राबविल्या जातात. जिल्हा बँकेने व्यवसाय वाढीसाठी भविष्यात मोबाइल बैंकिंग, इंटरनेट बँकिंग, यूपीआय यांसारख्या ई-बँकिंगच्या सेवा- सुविधा देणार आहे. नवीन शाखा उघडणे, शाखांचे नूतनीकरण करून बँकेस कार्पोरेट लूक देणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.