अरुण बारसकरसोलापूर : कांदा लागवडीला वेग आला असून मागील आठवड्यापर्यंत राज्यात दीड लाख हेक्टरपर्यंत लागवड झाली होती. कांदा लागवडीत आतापर्यंत सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.
कांदा लागवडीत अहमदनगर व नाशिक दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर आहेत. खरीप व लेट खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्यात कांदा लागवड क्षेत्र सर्वाधिक असले तरी रब्बी हंगामात नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लागवड क्षेत्र वाढणार आहे.
जून-जुलै महिन्यात राज्यात केवळ सोलापूर जिल्ह्यात कांदा लागवड झाल्याने पुढील दोन महिने सोलापुरी कांद्याचा बाजारात दबदबा राहणार आहे. ऊस, केळी, डाळिंब उत्पादनात सोलापूर जिल्हा सतत आघाडीवर असतोच; आता कांदा उत्पादनातही प्रथम राहतो की काय?, असे वाटू लागले आहे.
यंदा लवकर जून महिन्यात पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली होती. यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली.
त्यामुळे खरीप पेरणीच्या क्षेत्रात दुप्पटीहून अधिक वाढ झाली आहे. पेरणीनंतर पाऊसही चांगला पडत राहिल्याने पिके जोमात वाढली आहेत. केवळ सोयाबीनची पेरणी दीड लाख हेक्टरपर्यंत क्षेत्रावर झाली आहे.
तूर जवळपास एक लाख तर उडीद एक लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरल्याची कृषी खात्याकडे नोंद झाली आहे. कधी नव्हे इतक्या ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पेरणी केली असल्याचे दिसत आहे. खरीप हंगामातील पिकांसोबत यंदा कांद्याची पेरणीही जिल्हाभर झाली आहे.
१५ ऑगस्टपर्यंत कांदा पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी गेल्या १५-२० दिवसांपासून कांद्याची पेरणी व लागवड केली जात आहे. सगळीकडे कांद्याची लागवड सुरू असल्याचे दिसत आहे.
राज्यभरात जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड व पेरणी झाली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा प्रथम, अहमदनगर द्वितीय व नाशिक जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती लागवडसोलापूर जिल्ह्यात ३७ हजार हेक्टर, अहमदनगर जिल्ह्यात ३३ हजार हेक्टर, नाशिक जिल्ह्यात २९ हजार ५०० हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात १५ हजार ६०९ हेक्टर, पुणे जिल्ह्यात ८ हजार हेक्टर, धुळे ७ हजार हेक्टर, बीड सहा हजार हेक्टर, छत्रपती संभाजीनगर साडेचार हजार हेक्टर, साताऱ्यात साडेतीन हजार हेक्टर तर जळगाव जिल्ह्यात बाराशे हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाल्याची नोंद कृषी खात्याकडे झाली आहे.
सर्वाधिक कांदाजून व जुलै महिन्यात राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कांदा लागवड झाल्याने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील कांद्याचा बाजारात दबदबा राहणार आहे.