आलेगाव (ता. दौंड) दौंड शुगर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या गळीत हंगामातील उसाच्या अंतिम हप्त्याची रक्कम रु. १०० प्रति टन प्रमाणे लवकरच शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी दिली.
कारखान्याचा सन २०२४-२५ च्या १६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ अध्यक्ष जगदीश कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी कारखान्याची दैनिक गाळप क्षमता १७५०० प्रति मे. टन वाढविली आहे.
येणाऱ्या गाळप हंगामात २० लाख टन गाळपाचे उद्दिष्ठ ठेवले आहे. कारखान्याचा पारदर्शक कारभार, आर्थिक स्तरावरील योग्य नियोजन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोलाची साथ तसेच कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नातून कारखाना प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे.
मागील हंगामात कारखान्याने १८,०१,८७७.१८६ मे. टन गाळप करून १०.८२ टक्के सरासरी साखर उतारा राहिला आहे. या गाळप झालेल्या उसाला रु. २,९०० प्रति मे. टन प्रमाणे एकूण रक्कम रु. ५२२.५४ कोटी मात्र शेतकऱ्यांना अदा केली आहे.
लवकरच रु. १०० प्रति मे. टन प्रमाणे शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. यामुळे सदर हंगामातील अंतिम ऊस दर रु. ३००० प्रति मे. टन प्रमाणे देण्यात येईल, असे त्यांनी मत व्यक्त केले.
येणाऱ्या गळीत हंगामामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दौंड शुगर कारखान्यास गाळपासाठी आपला ऊस देण्याचे आवाहन कदम यांनी केले. कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन इंद्रजीत जगदाळे, उमादेवी जगदाळे, आबासाहेब सुरवसे, स्वातीताई सुरवसे यांच्या हस्ते पार पडला.
संचालक शहाजी गायकवाड यांनी कारखान्याचा सन २०२४-२५ च्या गाळप हंगामाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात ऊस गाळप सुरू करून पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप करण्यात येणार असल्याचे कार्यकारी संचालक शहाजी गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी डॉ. संगीता जगदाळे, मल्हार जगदाळे, आर्यन कदम, प्रद्युम्न जोशी, शशिकांत गिरमकर, दीपक वाघ, दिलीप बोडखे, चंद्रकांत सुद्रिक, संदेश बेनके, अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.