रत्नागिरी : लागवडीनंतर अवघ्या दोन वर्षांत उत्पन्न देणारी काजूची नवीन जात विकसित करण्यात लांजा तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी अमर खामकर यांना यश आले आहे.
चौथ्या किंवा पाचव्या वर्षी शेतकऱ्याला अपेक्षित उत्पन्न मिळेल, असा दावा खामकर यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नवीन काजूची जात फायदेशीर ठरणार आहे.
मुंबईत जन्म व शिक्षण घेतल्यानंतर निव्वळ गावाची आवड, यासाठी उच्च पगाराची नोकरी सोडून अमर खामकर गावाकडे येऊन स्थायिक झाले.
सन १९९८ साली काजूची पहिली लागवड केली. त्यांनी शेतीमध्ये अनेक प्रयोग यशस्वी केले. काजू बागेतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मॉडेल विकसित केले आहे.
हवामानात होणारे सातत्यपूर्ण बदल, रासायनिक खतांचा वापर, खतांच्या वाढत्या किमती, कीटकनाशक फवारणी खर्च, त्याचे दुष्परिणाम याचा विचार करून खामकर यांनी उत्तम प्रतिकारशक्ती असलेली काजूची जात विकसित केली आहे.
गेले आठ वर्षे याबाबत त्यांचे संशोधन सुरू होते. निव्वळ सेंद्रिय खते व पाणी याचा वापर पुरेसा आहे. दोन वर्षानंतर फळे येतात. परंतु पाच वर्षानंतर भरघोस उत्पादन मिळते.
मादी फुलांचे प्रमाण अधिक असल्यामुळे उत्पन्न भरपूर येते, १५ वर्षाचे कलम २० ते ४० किलो उत्पन्न देते. गावठी बियाण्यांच्या खुंटाचा वापर, कलमांमध्ये खोडकिड्याचे प्रमाण कमी, कोणत्याही कीड-रोगांचा प्रादुर्भाव नसलेली जात बागायतदारांसाठी फायदेशीर आहे.
उत्तम पोषणमूल्य व उत्तम चवीमुळे या सेंद्रिय काजूगरांना वाढती मागणी असून, सेंद्रिय उत्पादनामुळे दरही चांगला मिळणार आहे.
अधिक वाचा: काजू पीक पाहणीसाठी ब्राझीलची टीम येणार; काजू बोंडावर प्रक्रिया करण्यासाठी संशोधन