नवी दिल्ली येथे आज आयोजित करण्यात आलेल्या नागरी अलंकरण सोहोळ्यामध्ये, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, गोव्यातील संजय अनंत पाटील यांचा कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म श्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
पद्मश्री प्राप्त संजय अनंत पाटील यांचे जीवन आणि कार्य यांच्याविषयी थोडक्यात माहिती
स्थानिक परिसरात संजय काका म्हणून प्रसिद्ध असलेले संजय अनंत पाटील हे कल्पक शेतकरी आणि हरित क्रांतीचे पुरस्कर्ते आहेत. अनेक जण त्यांना ‘वन मॅन आर्मी’ म्हणूनही ओळखतात.
कारण त्यांनी एकट्याने दहा एकर ओसाड जमिनीवर नैसर्गिक शेती तसेच शून्य उर्जा वापरासह सूक्ष्म सिंचन पद्धतीचा संपूर्ण स्वीकार करून एकहाती हिरवेगार कुळागार (झाडांची लागवड आणि पशुधन यांच्यावर आधारित एकात्मिक कृषी पद्धती) उभे केले.
दिनांक ३१ ऑगस्ट १९६४ रोजी जन्मलेल्या संजय पाटील यांनी १९९१ पासूनच जीवामृताच्या वापरासह नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली. एकाच देशी वाणातील गाईचे शेण आणि गोमुत्र यांचा उपयोग करून ते दर महिन्याला ५,००० लिटर जीवामृताचे उत्पादन करतात.
रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा एक ग्रामदेखील न वापरता केवळ एक देशी गाय, दहा एकर शेतीसाठी पुरेशी आहे हे त्यांनी स्वतःच्या पद्धतीतून दाखवून दिले आहे.
जीवामृताचा उत्पादनाचा वेग वाढवून उत्पादन सुधारण्यासाठी त्यांनी स्वयंचलित जीवामृत उत्पादन संयंत्रांची रचना तसेच उभारणी केली. नैसर्गिक शेती प्रक्रियेचा स्वीकार केल्यानंतर त्यांचा उत्पादन खर्च ६० ते ७० टक्क्यांनी कमी झाला तसेच त्यांच्या पिकाचे उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आणि ३ लाखांची बचतही झाली.
संजय पाटील यांच्या शेतात असलेल्या टेकडीवर त्यांनी स्वतः एकट्याने सव्वाशे फुटाचा बोगदा (सुरंग) खणला आणि पावसाळ्यानंतरच्या काळात जाणवणारी पाणीटंचाईची मोठी समस्या सोडवली. त्याशिवाय त्यांनी पावसाचे पाणी गोळा करण्यासाठी त्यांच्या शेताच्या सभोवताली असलेल्या टेकड्यांवर पाझर खंदक खणले.
पाटील यांनी राबवलेल्या शून्य वीज, सूक्ष्म सिंचन आणि पर्जन्य जल संवर्धन पद्धतीच्या माध्यमातून एक वर्षभरात १५ लाख लिटर पाणी मिळेल अशी खात्रीशीर व्यवस्था निर्माण केली आहे.
पाटील यांनी फक्त ११ वी पर्यंतचे औपचारिक शिक्षण घेतले असले तरीही जल संवर्धन आणि नैसर्गिक कृषी पद्धतींच्या बाबतीत त्यांच्याकडे एखाद्या अभियंत्याला शोभेलसे ज्ञान आणि कौशल्य आहे.
ते केवळ अभिनव संशोधकच नाहीत तर गोवा येथील भारतीय कृषी संशोधन मंडळ-केंद्रीय तटवर्ती कृषी संशोधन संस्था तसेच स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञानांचा त्वरित स्वीकार करणारे शेतकरी आहेत.
संजय पाटील आदर्श शेतकरी असून त्यांचे शेत आवर्जून बघण्यासारखे आहे. दरवर्षी ३०० ते ५०० लोक त्यांच्या शेताला भेट देऊन तेथील नाविन्यपूर्ण यंत्रणा पाहतात. पाटील यांच्या या यशोगाथेने त्यांच्या सोबतच्या अनेक शेतकऱ्यांना खास करून तरुणांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी प्रेरणा देत आहे.
पाटील यांना गोवा राज्य सरकारकडून कृषिरत्न-२०१४ हा पुरस्कार मिळाला असून त्यांना आयएआरआय-कल्पक शेतकरी-२०२३ या पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.
अधिक वाचा: चार हजार फुटांवरून पाणी आणून दुष्काळी गावात फुलवली मिरचीची शेती