Join us

रिकाम्या पाण्याच्या नारळापासून ही महापालिका बनवतेय शेती उपयोगी उत्पादने

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 3:18 PM

उन्हाळ्यात नारळपाणी पिण्याचे प्रमाण जास्त असल्याने या काळात नारळपाणीचा सुमारे ४० टनपेक्षा जास्त कचरा दररोज तयार होतो. तो डम्पिंगवर न नेता त्यापासून कोकोपीट, काथ्या व क्वॉयर बनवली जात आहे.

धीरज परबमीरा रोड : उन्हाळ्यात नारळपाणी पिण्याचे प्रमाण जास्त असल्याने या काळात नारळपाणीचा सुमारे ४० टनपेक्षा जास्त कचरा दररोज तयार होतो. तो डम्पिंगवर न नेता त्यापासून कोकोपीट, काथ्या व क्वॉयर बनवली जात आहे.

महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या उपक्रमामुळे कचरा आणि त्याच्या वाहतुकीचा खर्च कमी होऊन पालिकेला कोकोपीट मोफत मिळणार आहे. नारळाच्या कचऱ्यावर अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी मीरा-भाईंदर ही पहिली महापालिका ठरणार आहे.

शहरात ओला व सुका कचरा अजूनही बहुतांश नागरिक, व्यावसायिक हे वेगवेगळा करून देत नसल्याने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात मोठा अडसर निर्माण झाला आहे. त्यातच शहरात जागोजागी नारळपाणी विक्रेते असून, त्यातून मोठ्या प्रमाणात नारळाचा कचरा निर्माण होतो.

नारळपाणीचा कचरा हा वजनाने जास्त असतो. त्यामुळे तो वाहतूक करून डम्पिंगला नेणे खर्चीक ठरते. नारळाचा कचरा सुकून तो अतिशय ज्वलनशील ठरतो. आयुक्त संजय काटकर यांनी ही बाब विचारात घेऊन नारळपाणीचा कचरा हा डम्पिंगला न नेता त्याच्यावर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करता येणे शक्य असल्याने त्यानुसार आढावा घेतला.

शहरात दररोज नारळपाणीच्या मोठ्या तीन गाड्या येतात. एका गाडीत सुमारे १८ टन वजनाचे पाणीवाले नारळ येतात. शहरात नारळपाणीचे सुमारे १० वितरक असून, सुमारे २५० च्या घरात नारळपाणी विक्रेते आहेत. उन्हाळ्याच्या काळात नारळपाणीची मोठी मागणी असते. त्यामुळे नारळपाणीच्या कचऱ्याचे प्रमाणसुद्धा वाढून या काळात सुमारे ४० टन कचरा दररोजचा निर्माण होत असतो.

प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातपालिका आयुक्त काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने नारळपाणीच्या नारळाचा कचरा डम्पिंग येथे न नेता आता भाईंदर येथे एका उद्योजकास त्यापासून वस्तू बनवण्याकरिता पुरवण्यास प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केली आहे. सध्या एकट्या मीरा रोड प्रभाग समिती ५ मधील रोजचा होणारा ५ टन नारळाचा कचरा भाईंदर फाटक येथील प्रक्रिया केंद्रात दिला जात आहे. प्रक्रिया केंद्र हे हिमांशू पटेल हा तरुण चालवत आहे.

पालिका करणार रीतसर करार- पाणी प्यायल्यानंतर उरणारा नारळाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून कोकोपीट तयार केले जात आहे.- कोकोपीट हे खत म्हणून वापरले जातेच, शिवाय त्या कोकोपीटमध्ये भाज्या आदी विविध लागवडसुद्धा करता येते.- कोकोपीटशिवाय नारळातील रेषापासून क्वॉयर बनवली जात आहे. ती गादीपासून विविध वस्तूंमध्ये वापरली जाते. नारळाच्या रेषांपासून दोरी आदी विविध वस्तू बनवता येतात.पालिकेच्या माध्यमातून शहरातील नारळाचा कचरा देण्याच्या बदल्यात उत्पादक हे पालिकेला कोकोपीटचा हिस्सा मोफत देणार आहे.सध्या हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर यशस्वीरीत्या राबवला जात असून, लवकरच पालिका व उत्पादक यांच्या रीतसर करार केला जाणार आहे.

टॅग्स :नगर पालिकाशेतीसेंद्रिय खतपाणी