वेगळ्या मधुर चवीसाठी राज्यात प्रसिद्ध असलेला अलिबागचा हापूस आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात येण्यास आणखी १०-१५ दिवसांची प्रतीक्षा आहे. बदलत्या हवामानामुळे यंदा मोहर उशिरा आल्याने हा फळांचा राजा तयार होण्यास विलंब झाला आहे.
दोन महिन्यांपासून अलिबाग-पेण, अलिबाग-रेवदंडा मार्गांवर ठिकठिकाणी हापूस आंब्यांची दुकाने दिसत आहेत. मात्र, हा रत्नागिरीचा आहे. या आंब्याची ५ डानची एक पेटी २ हजार रुपयांत विकण्यात येते.
अलिबागसह अन्य समुद्रकिनारी फिरण्यासाठी येणारे पर्यटक हा आंबा खरेदी करतात. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांसमोर शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशी तर मोठी गर्दी होते. एका दुकानातून दिवसाला ४० आंब्याच्या पेट्या विकल्या जातात, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.
यंदा उशिरा मोहर; आंबे अद्याप झाडावरच
- बदलत्या वातावरणामुळे रायगड जिल्ह्यातील आंबा बाजारात अद्याप दाखल झाला नाही. त्यामुळे नवी मुंबई, रत्नागिरीतील आंबा अलिबागच्या बाजारात विक्रीसाठी आहे. अलिबाग तालुक्यातील हापूस आंब्यांच्या झाडांना यंदा उशिरा मोहर आला. बदलत्या वातावरणाचा हा फटका आहे.
- दरवर्षी मार्चअखेरीस येथील आंबा बाजारात येतो. यंदा आंबे अद्याप झाडावरच आहेत. १० ते १५ दिवसांत ही फळे झाडावरून उतरवण्यास सुरुवात होईल, त्यानंतरच बाजारात येण्यास सुरुवात होईल.
● रायगडात आंब्याची लागवड १४ हजार हेक्टर क्षेत्रात आहे. त्यापैकी १२,५०० हेक्टर उत्पादन क्षेत्र आहे.
● जिल्ह्यातील बाजारात यंदा आबा लवकरच दाखल झाला. मात्र, तो अलिबागचा नाही.
● जानेवारी महिना संपल्यावर वेध लागतात. मार्चअखेर आंबा बाजारात येतो.
या वर्षी सतत वातावरणातील बदलामुळे थ्रीप्स नावाच्या नव्या रोगाचा प्रादुर्भाव रायगडमध्ये हापूसवर झाला आहे. तो रोखण्यासाठी सध्या कीटकनाशक नाही. या रोगामुळे काही ठिकाणच्या आंब्याची वाढ झाली नाही. त्यामुळे येथील आंबा येण्यास उशीर झाला आहे. १० एप्रिलपर्यंत येथील स्थानिक आंबा बाजारात दाखल होईल. अंदाजित दीड हजार रुपये पेटी असा भाव असेल, असा अंदाज आहे. - निलकंठ पाटील, आंबा बागायतदार, शिरवली
अलिबाग येथे पर्यटनासाठी आल्यावर आवडीने आम्ही येथील स्थानिक पदार्थ खरेदी करतो. मात्र, सध्या येथे जिल्ह्याबाहेरील आंबा विक्रीसाठी आहे. अलिबागच्या आंब्याची आम्हाला प्रतीक्षा आहे. - शैलेश जाधव, पर्यटक, मुंबई