इस्लामपूर : येथील बहुचर्चित ठरलेल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने उभा राहिलेल्या एन. डी. शुगर्स या गूळ पावडर, खांडसरी आणि वीजनिर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या बॉयलरचे अग्निप्रदीपन बुधवारी झाले.
यावेळी मार्गदर्शक संचालक केदार पाटील यांनी येत्या १० दिवसांत पहिला चाचणी गळीत हंगाम सुरू होईल. गाळपासाठी आलेल्या उसाला एकरकमी ३,३०० रुपयांचा दर देणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.
केदार पाटील म्हणाले, अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांच्या अथक परिश्रमाने हा प्रकल्प साकारला आहे. दोन नद्यांची सुपीकता आणि ऊस पिकाची मुबलकता असूनही गेल्या ५० वर्षांत दुसरा कारखाना झाला नव्हता.
आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभा राहिला आहे. राज्यातील उच्चांकी असणारा ३,३०० रुपयांचा दर आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यावर देणार आहोत.
कारखान्याचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हा प्रकल्प उभा करण्याचे आई-वडिलांचे स्वप्न होते. ते साकारल्याचा आनंद आहे.
आमची कोणाशीही स्पर्धा नाही. मानवी चुका टाळून कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी सर्व यंत्र सामग्री आधुनिक तंत्रज्ञानावर चालणार आहे. ६०० हून अधिक युवकांना प्रत्यक्ष तर इतरांना अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध होईल.
ते म्हणाले, ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना मोबाइलवर सर्व माहिती दिली जाणार आहे. उसाचे वजन कोठूनही करून आणायची मुभा असणार आहे.
संचालिका अंजली पाटील म्हणाल्या, कारखान्याच्या माध्यमातून महिला बचत गटांना रोजगार देणार आहोत. महिलांसाठी इतर प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न राहील.
यावेळी संचालक मिलिंद पाटील, धनंजय पाटील, मुकुंद पाटील, सर्जेराव बोडरे, समीर तांबोळी, ज्ञानराज निंबाळकर, मीरा निंबाळकर उपस्थित होत्या.
२५०० मेट्रिक टन गाळप क्षमतावाघवाडी गावच्या हद्दीतील शकुंतलानगर परिसरात ३० एकर जागेमध्ये १२५ कोटी रुपये खर्च करत हा कारखाना उभा राहिला आहे. दैनंदिन २५०० मेट्रिक टन गाळप क्षमता असून, ६ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. पुढच्या टप्प्यात प्रतिदिन १ लाख ५० हजार लिटर क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प उभा केला जाणार आहे, त्याची मान्यताही मिळाली आहे. बुधवारी शकुंतला नारायण पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.