दरीबडची : रिमझिम पाऊस, ढगाळ हवामान यामुळे जत तालुक्यातील दरिबडची, सिद्धनाथ येथील डाळिंब बागांवर बिब्या, चिक्की, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.
बागा सुरक्षित ठेवण्यासाठी व बिब्या, बुरशीजन्य रोगापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी डाळिंब बागांवर प्लास्टिक कागद, कापडाचे आच्छादन घातले आहे. रोगापासून संरक्षण होऊन डागविरहित व दर्जेदार फळांचे उत्पादन होते.
तालुक्यात ११ हजार ३४४.५९ हेक्टर डाळिंबचे क्षेत्र आहे. शेत तळी, कूपनलिका खोदून उजाड फोंड्या माळरानावर बागा फुलविल्या आहेत. डिसेंबर-जानेवारी महिन्यांतच विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या पडल्या होत्या.
उन्हाळ्यात टँकरने पाणी घालून द्राक्ष व डाळिंब बागेची जोपासना केली आहे. बहुतांश शेतकरी जून महिन्यात मृग नक्षत्रात डाळिंब धरतात. यावर्षी जूनपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. प्रतिकूल हवामानामुळे बिब्या रोगाची लागण होत आहे.
बागेवर महागडी औषधे, खत, मशागत यावर खर्च केला आहे. संपूर्ण बहरच वाया गेल्यास लाखो रुपयांचा फटका बसणार आहे. फळावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन काळे डाग पडू लागले आहेत. डाग पडलेल्या फळांना मार्केट मिळत नाही. दर कमी मिळतो. व्यापारी खरेदी करीत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे.
रोगापासून डाळिंबांना वाचविण्यासाठी प्लास्टिक कागद, कापड आहे. पातळ प्लास्टिक कागद व कापड टाकून झाकले जाते. सूर्याची किरणे त्यातून आरपार होतात. हवेतील जिवाणू, विषाणूंना अटकाव होतो. फळावर डाग येत नाहीत. बागेला कमी लागते. खर्चाची बचत होते. फळाला चकाकी येते. बागेला आच्छादनासाठी एकरी ६० हजार रुपये खर्च येतो. दोन ते तीन वर्षे टिकतो.
आच्छादनावर येणारा खर्च
• प्लास्टिक कागद, कापड : १६५ रुपये (किलो)
• बांबू एक बंडल : ८०० रुपये
रिमझिम पाऊस, ढगाळ हवामानामुळे बागेवर बिब्या व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. संरक्षणासाठी खास बनविलेल्या कागदाने बाग झाकून घेतली आहे. त्यामुळे फळांवर डाग पडत नाही. हवामानाचा परिणाम होत नाही. फळ दर्जेदार व चकाकीदार येतात. - राजू दाशाळ, डाळिंब बागायतदार, दरीबडची
अधिक वाचा: Pomegranate Variety डाळिंब लागवड करताय.. कोणती जात निवडाल?