उरण : देशभरातील शेतकऱ्यांच्या कृषी मालाची थेट जेएनपीटीए बंदरातून आयात-निर्यात करण्यासाठी कृषी वस्तू आधारित प्रक्रिया आणि साठवण सुविधा केंद्राच्या निर्मितीसाठी जेएनपीटीएने बुधवारी दोन कंपन्यांशी करार केला.
एकाच छताखाली शीतगृह, प्री-कूलिंग, गोठवलेली साठवणूक, गोदामे असणार आहेत. २८५ कोटी खर्च करून हा प्रकल्प २७ एकर क्षेत्रावर १८ महिन्यांत उभारण्यात येणार आहे.
कृषी वस्तू-आधारित प्रक्रिया आणि साठवण सुविधा केंद्राच्या निर्मितीनंतर दरवर्षी १.२ दशलक्ष टन कृषी मालाची हाताळणी होणार आहे. अशी माहिती जेएनपीए अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली.
१.२ दशलक्ष टन कृषी वस्तू हाताळण्यासाठी रचना
अ) अन्नसुरक्षा आणि व्यापार अनुपालन मानकांची पूर्तता करण्यासाठी कार्यक्षम प्रक्रिया, वर्गीकरण, पॅकिंग आणि प्रयोगशाळा चाचणी सुनिश्चित करण्यासाठी दरवर्षी अंदाजे १.२ दशलक्ष टन कृषी वस्तू हाताळण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे.
ब) एकाच छताखाली सर्वसमावेशक साठवण उपाय प्रदान करण्यात येणार आहेत. यामुळे काढणी पश्चात होणारे नुकसान लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत मिळणार आहे.
क) यामुळे ताजी फळे, भाज्या, बासमती नसलेला तांदूळ, मका आणि सागरी उत्पादने आणि मसाले यासारख्या नाशवंत नसलेल्या वस्तूसह विविध प्रकारच्या कृषी वस्तूंची आपूर्ती करण्यासाठी कृषी केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
अखंडित लॉजिस्टिक्सला पाठिंबा देण्यासाठी या सुविधेमध्ये निर्यात पॅकहाउस, विस्तृत लोडिंग, अनलोडिंग झोन, प्रशासकीय सुविधा आणि शाश्वततेसाठी हरित जागादेखील समाविष्ट असतील. तसेच सुविधा आणि बंदराची एकूण कार्यक्षमता सुधारण्यासाठी, सीमाशुल्क मंजुरी आणि अन्न चाचणी ही सुविधाही प्रदान करण्यात येणार आहे. - उन्मेष वाघ, अध्यक्ष, जेएनपीए