ए. जे. शेखकागल : सहकार तत्त्वावरील ‘आदर्श साखर कारखाना’ म्हणून देशभर लौकिक असलेल्या येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखान्यास नवी दिल्ली येथील राष्ट्रीय साखर महासंघाकडून देशपातळीवरील अतिउत्कृष्ट साखर कारखाना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याने तब्बल सात वेळा देशात सर्वोत्कृष्ट, असा पुरस्कार मिळविला असून राज्य पातळीवर सहा वेळा अशी कामगिरी केली आहे.
‘शाहू ग्रुप’चे अध्यक्ष समरजित घाटगे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा तसेच संस्थापक-अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांनी घालून दिलेल्या तत्त्वांची जोपासना करीत कारखाना वाटचाल करीत आहे. अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांचे मार्गदर्शन, सभासद, शेतकऱ्यांनी दिलेली साथ व अधिकारी-कर्मचारी यांचे परिश्रम या सर्वांचे हे फलित आहे.
कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले की, संचालक मंडळाने एकदा धोरण निश्चित केले की प्रशासनाने त्याची अंमलबजावणीच करायची व संचालक मंडळाने त्यामध्ये पुन्हा कोणताही हस्तक्षेप करण्याचा नाही.
हे विक्रमसिंह घाटगे यांनी घालून दिलेले धोरण त्यांच्या पश्चातही समरजितसिंह घाटगे, अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी काटेकोरपणे जोपासले आहे व संचालक मंडळाची ही चांगली साथ मिळाल्याने कारखान्याचा सर्वोत्कृष्टपणा कायम आहे.
पुरस्कारांची मांदियाळी कायमकारखान्यास वेगवेगळ्या निकषांतून मिळालेल्या पुरस्कारांची संख्या सत्तरवर पोहोचली आहे. त्यामध्ये राज्य पातळीवरील ४४ तर देशपातळीवरील २६ पुरस्कार आहेत. या मध्ये २२ पुरस्कार उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठीचे आहेत. कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांच्या पश्चातही पुरस्कारांची परंपरा कायम आहे.
राजर्षी शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष व विक्रमसिंह घाटगे यांच्या अमृतमहोत्सवी जयंती वर्षात कारखान्याचा देशपातळीवर झालेला हा गौरव म्हणजे कारखान्याने प्रत्यक्ष कृतीतून त्यांना केलेले अभिवादन आहे. राष्ट्रीय पातळीवर झालेला हा सन्मान सभासद-शेतकऱ्यांचा सन्मान आहे. - सुहासिनीदेवी घाटगे, अध्यक्षा, शाहू साखर कारखाना