Join us

राज्यातील ह्या साखर कारखान्याने दिला एफआरपीपेक्षा जादा दर.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 10:58 AM

सोमेश्वरनगर बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील २०२३- २०२४ गाळप हंगामातील उसाला ३ हजार ५७१ रुपये उच्चांकी ऊस दर जाहीर केला आहे.

सोमेश्वरनगर बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील २०२३- २०२४ गाळप हंगामातील उसाला ३ हजार ५७१ रुपये उच्चांकी ऊस दर जाहीर केला असून राज्यात 'एफआरपी'पेक्षा ६९७ रुपये जास्त दर देणारा सोमेश्वर कारखाना राज्यातील क्रमांक एकचा कारखाना राहिला आहे.

नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या सर्वोच्च ऊस दरावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. 

असा मिळणार दरकारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद यांच्या जानेवारीमध्ये तुटणाऱ्या उसास टनाला ७५ रुपये फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या उसास १०० रुपये मार्चमध्ये तुटणाऱ्या उसास १५० रुपये व त्यानंतर हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या उसास २०० रुपये अनुदानासह अनुक्रमे जानेवारीमध्ये तुटलेल्या उसास टनाला ३ हजार ६४६ रुपये, फेब्रुवारीमध्ये तुटलेल्या उसास ३ हजार ६७१ रुपये, मार्चमध्ये तुटलेल्या उसास ३ हजार ७२१ रुपये, तर मार्चनंतर हंगाम संपेपर्यंत तुटलेल्या उसास ३ हजार ७७१ रुपयांचा असा ऊस दर कारखान्याने शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीर केल्याची माहिती जगताप यांनी दिली.

जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, मागील गाळप हंगाम २०२३-२०२४ मध्ये कारखान्याने एकूण १५ लाख २३ हजार ८७६ मे. टनाचे गाळप केले असून बी हेवीसह सरासरी १२.२१ टक्के साखर उतारा राखीत १८ लाख २६ हजार ५०० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.

त्याचसोबत कारखान्याच्या को-जन प्रकल्पामधून १० कोटी ४९ लाख ५१ हजार १३६ युनिट्सची वीजनिर्मिती केली असून ५ कोटी ८२ लाख १७ हजार ६०४ युनिट्सची वीज विक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पातून १,००,२१,००० लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून सोबत ४०,७३,७७३ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक कारखाना प्रशासनावर असणारे काळजीपूर्वक लक्ष व त्यांचे वेळोवेळीचे मार्गदर्शन, तसेच संचालक मंडळाचे काटकसर व उत्तम नियोजनपूर्व कारभार यामुळे आपला सोमेश्वर सर्वोच्च ऊस दराची परंपरा कायम राखू शकला. कारखान्याच्या सर्वोच्च ऊस दर देण्याच्या परंपरेसोबतच संचालक मंडळाने कारखान्याची विस्तारवाढ, को-जनरेशनची विस्तारवाढ पूर्ण केलेली असून लवकरच डिस्टिलरीची विस्तारवाढ पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. - पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेतीपुणेकाढणीमहाराष्ट्रबारामती