Join us

एकरी चौदा क्विंटल पर्यंत उतार अन् एक लाखापर्यंत उत्पन्न मिळवून देणारा तुरीचा हा वाण पॉप्युलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:52 IST

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेला तुरीचा गोदावरी वाण हा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची उन्नती साधण्यासाठी लाभदायक ठरत आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेला तुरीचा गोदावरी वाण हा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची उन्नती साधण्यासाठी लाभदायक ठरत आहे. मागील दोन-तीन वर्षापासून मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये या वाणाने शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी क्रांती केलेली आहे.

२३ डिसेंबर रोजी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त प्रदर्शनात केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री माननीय शिवराज सिंह चौहानजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली, यावेळी त्यांना शेतकऱ्यांनी गोदावरी वाणापासून एकरी १४ क्विंटल पर्यंत उतार घेतल्याचे सांगितले.

या वाणाद्वारे शेतकऱ्यांना साधारणपणे एकरी एक लाखापर्यंत उत्पन्न मिळत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यापीठास प्राप्त होत आहे. शेतकरी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाद्वारा विकसित तुरीच्या गोदावरी वाणाद्वारे ऊसाला पर्यायी पीक म्हणून पाहत आहेत.

गोदावरी वाण हा शेतकरी प्रिय असल्यामुळे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक, उप संचालक यांनी देखील गोदावरी वाणाचा उल्लेख पुसा येथून विकसित राष्ट्रीय पातळीवर बासमतीच्या ११२१ हा जसा देश पातळीवर गाजला होता, त्याची जागा घेण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि मध्यवर्ती प्रक्षेत्र प्रमुख डॉ. विलास खर्गखराटे हे विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर अहोरात्र कार्य करत असून शेतकऱ्यांना तुरीसह सोयाबीन, ज्वार, करडई, हरभरा अशा विविध पिकांचे गुणवत्ता युक्त बियाणे देण्यासाठी कटिबद्ध आहेत.

विद्यापीठाने मध्यवर्ती प्रक्षेत्रावर नव्याने विकसित केलेल्या ८०० हेक्टर क्षेत्रापैकी यावर्षी ८५ हेक्टरवर (सायळा ब्लॉक ३० हेक्टर आणि तरोडा/बलसा ब्लॉक ५५ हेक्टर) सलग गोदावरी वाणाची पेरणी केली. या प्रक्षेत्राची पाहणी कुलगुरू मा. प्रा. (डॉ) इन्द्र मणि यांनी दिनांक १ जानेवारी केली.

संपूर्णतः कोरडवाहू क्षेत्रावर सध्या हा वाण अतिशय उत्कृष्ट स्थितीमध्ये विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर बहरलेला आहे. या वाणाची पेरणी ५ ते १० जुलैच्या दरम्यान १२० बाय १५ सेंटीमीटर करण्यात आलेली आहे. यासाठी पूर्णतः पेरणी पासून ते आंतर मशागत, फवारणी आणि काढणीपर्यंतचे सर्व कामे यांत्रिकीकरणाद्वारे केली जात आहेत.

तुरीसाठी खताची शिफारस हेक्टरी २५:५०:० अशी आहे, परंतु विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर ५० टक्केच खताची मात्रा वापरली. उगवणीपश्चात एक तणनाशकाची फवारणी केली. किड नियंत्रणासाठी दोन फवारण्या करण्यात आल्या. यामुळे उत्पादन खर्चासह वेळेमध्ये जवळपास  ४० ते ५० टक्के बचत झाली आहे.

विद्यापीठाने तुरीसह सोयाबीन, ज्वार, करडई, हरभरा अशा विविध पिकांच्या वाणांचे बीजोत्पादन विद्यापीठाच्या नव्याने विकसित ८०० हेक्टर प्रक्षेत्रावर करत असल्यामुळे विद्यापीठाच्या लगत असलेली गावे सायळा, टाकळगव्हाण, शेंद्रा, रायपूरचा काही भाग, खानापूरचा काही भाग या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या रोजगाराचा प्रश्न काही अंशी कमी झाला.

विद्यापीठात खरीप, रबी हंगामात पूर्ण क्षमतेने तर उन्हाळी हंगामात सोयाबीनचे बिजोत्पादन घेतले जाते. यामुळे या परिसरातील जवळपास ३५० ते ४०० ग्रामस्थांना ११ महिन्यापर्यंतचा रोजगार उपलब्ध मिळून त्यांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर देखील थांबले आहे.

गोदावरी या वाणाची पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास १५,५०० हेक्टरवर लागवड केली असून सोलापूरच्या करमाळा तालुक्यात ४० शेतकरी गटांच्या माध्यमातून ४०० हेक्टरवर पेरणी केली. यासाठी विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन त्यांना मिळत आहे.

शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना कमी बियाण्याचा वापर करून टोकन पद्धत, ठिबक सिंचन व जैविक घटकांचा वापर या तंत्रज्ञान अशी योग्य मानके ठरवून दिली आहेत. याचा उपयोग करून १५ ते २० क्विंटल प्रती हेक्टरपर्यंत उत्पादन घेत आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील मौजे खादगाव येथे एकाच ठिकाणी जवळपास ७०० एकर प्रक्षेत्रावर गोदावरी वाणाची पेरणी केलेली आहे. या प्रक्षेत्रास माननीय कुलगुरू यांनी दिनांक ३ जानेवारी रोजी भेट देऊन पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शेतकऱ्यांनी माननीय कुलगुरू यांना दिलेल्या प्रतिक्रियानुसार गोदावरी या वाणाच्या शेंगांमध्ये चार ते पाच दाणे असून मर रोगास बळी पडत नसून कोरडवाहू क्षेत्रात एकरी १० ते १२ क्विंटल आणि ठिबक सिंचनवर लागवड केल्यास जवळपास १८ क्विंटल पर्यंत उतार मिळू शकतो.

शिवाय एखाद्या शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रावर लागवड केली तर त्यास कोरडवाहू मध्ये १२ ते १४ क्विंटल उतार मिळतो याबरोबरच अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे आंतरपीक घेवून सोयाबीनचे ७ ते ८ क्विंटल उत्पादन घेतल्याचे सांगितले. 

टॅग्स :तूरशेतकरीशेतीमराठवाडापीकवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठदेवेंद्र फडणवीसशिवराज सिंह चौहानठिबक सिंचन