सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे: गैरसमजुतीमुळे सापांची संख्या कमी होत आहे. सापाला स्व-संरक्षणासाठी दिलेली विषाची देणगीच जीवघेणी ठरत आहे. शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या सापाकडे शत्रू म्हणून पाहिले जाते; परंतु याच सापांना सुरक्षित पकडून अधिवासात सोडून, जीवदान देणारे ३० सर्पमित्र पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) गावात आहेत.
त्यामुळे सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्रांचं गाव म्हणून 'पोर्ले'ची ओळख बनली आहे. सर्पमित्र दिनकर चौगुले यांनी १९७७ पासून साप पकडायला सुरुवात केली. सापांबद्दल गैरसमजुती दूर करत सर्पमित्र तयार करण्यासाठी १९८३ ला सर्पालय सुरू केले. त्यामुळेच गावात अनेक सर्पमित्र तयार झाले.
चौगुले यांना साप पकडताना अकरावेळा सर्पदंश झाला; परंतु आत्मविश्वास व धाडसाने त्यांनी हजारो साप पकडून जीवदान दिले. आजही त्यांची गावोगावी जनजागृती सुरू आहे. चौगुलेंचे कौशल्य बघून त्यांच्या सान्निध्यात असणाऱ्या अनेक तरुणांनी साप पकडायला सुरुवात केली.
कोणत्याही जातीचा साप असू दे! त्याला सहजपणे पकडणाऱ्या गावातील बहुतांशी सर्पमित्राला सर्पदंश झालेला नाही. त्यामुळे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक भागात पोर्लेतील सर्पमित्रांनी अडगळीत असणाऱ्या सापांना पकडून सुरक्षितस्थळी सोडले जात आहे.
गावात तीसहून अधिक सर्पमित्र तयार झाले असून, काही तरुणाई शिकत आहे. त्यामुळे गावात सापांना मारले जात नसून त्यांना जिवंत पकडून सोडले जात असल्याने सापांच्या दृष्टीने ही जीवदानाची गोष्ट आहे.
गावात ४८ वर्षांपूर्वी सापांना शेपूट धरून मारले जायचे. ही बाब मला वेदनादायी वाटली म्हणून धाडसाने सापाला धरायला शिकलो. मला अकरावेळा नाग चावला आहे. त्यानंतर गावात एकाचे एक बघून नवीन पिढी साप धरायला शिकली. अनेकजण सापाला पकडून अधिवासात सोडत आहे. सापांबाबत गावोगावी जनजागृती करत आहे. - सर्पमित्र दिनकर चौगुले