मारुती वाघ
मोडनिंब: माढा तालुक्यातील भेंड गावामध्ये गेल्या वर्षांपासून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारण व पर्जन्यमानावर आधारित पीक पद्धती या प्रकल्पाची सुरुवात झाली.
मिलेटला महत्त्व देण्यात येत आहे. यंदा साधारणतः २० ते २५ शेतकऱ्यांनी मिलेटची लागवड केली आहे. ज्यामध्ये राळ, वरी, नाचणी, शामूल, कोद्रा आणि हळवी या मिलेटचा समावेश आहे.
सन २०२३ हे जागतिक मिलेट वर्ष असल्याने गेल्या वर्षीच्या खरिपात मिलेट बियाणे वाटप केले होते. त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून अगदी थोड्या क्षेत्रावर प्रात्यक्षिक लागवड केली होती; पण या वर्षीच्या चालू खरिपामध्ये गेल्या वर्षीचा लागवडीचा अनुभव, क्षेत्र भेटीचे आयोजनपर जनजागृती तसेच मिलेटचे पोषण आहारातील महत्त्व व कमी पाण्यामध्ये येणारे पीक या सर्व गोष्टींचा विचार झाला.
मिलेटसाठी बीज हे इक्रिसॅट संस्थेने उपलब्ध करून दिले आहे. येणाऱ्या रबीमध्येही मिलेटचे प्रात्यक्षिक घेण्याचे नियोजन संस्थेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. मिलेटचे पीक काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने घेत आहेत. याबरोबरच भेंड गावात या प्रकल्पांतर्गत जलसंधारणाची कामे प्रगतिपथावर आहेत.
कोअर वॉल, नाला प्लग, नाला खोलीकरण व बांध बंदिस्ती यांचा समावेश आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मुश्ताक शेख, इक्रिसॅटचे वरिष्ठ संचालक डॉ. मांगी लाल जाट, आयडीसी प्रमुख डॉ. रमेश सिंग, प्रकल्प प्रमुख डॉ. कौशल गर्ग व डॉ. इसरार मजीद यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
शेतकरी स्वतःहून वळाले मिलेट लागवडीकडे
मिलेट लागवडीबाबत सुरुवातीला शेतकऱ्यांना एक ते दोन गुंठे जमिनीत लागवड करा अशी सांगितले. मात्र, त्यापासून स्वतःच्या कुटुंबाला व इतरांनाही अतिशय आरोग्यदायी असा याचा फायदा होत असल्यांने अनेक शेतकऱ्यांनी सध्या दहा ते वीस गुंठे लागवडीस पुढाकार घेतले आहे. भेंड गावांमध्ये मिलेट उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होणार आहे.
आमच्या गावामध्ये या पूर्वी लोकसहभागातून व काही संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची व विकासाची कामे झाली आहेत. या प्रकल्पाअंतर्गत होणारी कामे व खासकरून मिलेट लागवडमुळे निश्चितच भेंडीनगरीची वेगळी ओळख निर्माण होईल. सर्व गावकऱ्यांचे सांघिक यश म्हणता येईल. शेतकरी मिलेटची लागवड सेंद्रिय पद्धतीने करीत आहेत. - डॉ. संतोष दळवी माजी सरपंच, भेंड