अरुण बारसकर
सोलापूर : मागील वर्षी काही जिल्ह्यात सरासरी गाठलेला पाऊस अनेक जिल्ह्यात अत्यल्प पडला होता. त्याचा फटका राज्यातील उसाच्या क्षेत्राला बसला आहे. राज्यात दोन लाख ४० हजार तर सोलापूर जिल्ह्यात ६१ हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे. त्यामुळे यंदाच्या गाळप हंगामावर कमालीचा परिणाम होणार असल्याचे साखर कारखान्यांकडून सांगण्यात येत आहे.
सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात ऊस लागवड, साखर कारखान्यांच्या संख्येत आघाडीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मागील वर्षी राज्यात जेमतेम पाऊस पडला होता. सोलापूरसह मराठवाड्यात पावसाने अत्यल्प हजेरी लावली होती. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली होती.
जूनपासून पाऊस म्हणावा तितका न पडल्याने व भरवशाच्या परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्याने उसाची नव्याने लागवड झाली नव्हती. शिवाय पाण्याची अडचण असल्याने खोडवाही काढून टाकावा लागला. यामुळे राज्यात उसाचे क्षेत्र कमालीचे घटले आहे.
यवतमाळमध्ये ७ हजार क्षेत्र वाढले..
■ राज्यातील २१ जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात दोन लाख ४० हजार हेक्टरने घट झाली असली तरी ६ जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. धुळे जिल्ह्यात ८१२ हेक्टर, हिंगोलीत ११ हजार ११२ हेक्टर, बुलढाणा ३७८ हेक्टर, वाशिम ७६ हेक्टर, यवतमाळ ६८१९ हेक्टर तर चंद्रपूर जिल्ह्यात २४ हेक्टर उसाचे क्षेत्र गतवर्षीपेक्षा वाढले आहे.
■ दरवर्षी जुलैपासून चांगला पाऊस सुरू होतो. त्यामुळे ऑगस्ट महिन्यानंतर उसाची लागवड सुरू होते. यंदा जून महिन्यात दमदार पाऊस झाल्याने जुलै महिन्यात उसाची लागवड केली जात आहे. चांगला जोपासलेला ऊस येत्या गळीत हंगामाच्या शेवटी गाळपाला येऊ शकतो.
जिल्हा | मागील उसाचे क्षेत्र | घटलेले उसाचे क्षेत्र |
सोलापूर | २,१०,९५७ | ६०,३७१ |
धाराशिव | ७५,०७५ | ४३,०९३ |
अहमदनगर | १,५२,३३१ | ९,७०३ |
बीड | ५,८२,१५३ | ३२,७०८ |
सातारा | १,१६,७११ | ३०,१५५ |
पुणे | १,४३,४५२ | १७,७७० |
जालना | ४८,२७५ | १६,५८१ |
लातूर | ५४,२५५ | १७,८६६ |
सांगली | १,४४,१२७ | ७,०२७ |
ऊस क्षेत्राचे आकडे हेक्टरमध्ये आहेत.
मागील वर्षी पाऊस कमी पडल्याने ऊस क्षेत्राला फटका बसणे साहजिकच आहे. सोलापूर, धाराशिव, बीड व सातारा जिल्ह्यात ऊस क्षेत्रात सर्वाधिक घट झाली आहे. यंदा पाऊस चांगला पडत असल्याने ऊस क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी एकराची संख्या वाढविण्यापेक्षा एकरी उतारा वाढविण्यावर लक्ष द्यावे. मागील गळीत हंगामात १४ लाख ७ हजार २१ हेक्टर ऊसतोडणी झाली होती. येत्या गळीत हंगामासाठी अंदाजे ११ लाख ६७ हजार ४३ हेक्टर ऊस नोंदला आहे. - डॉ. कुणाल खेमनार, साखर आयुक्त, पुणे