हवामान बदलामुळे केसर आंब्याला ऑक्टोबर महिन्यातच मोहर आल्याने यंदा आमरस लवकर चाखता येणार आहे. दरवर्षी मराठवाडा, विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रात आंब्याच्या झाडांना डिसेंबर ते जानेवारी महिन्यात मोहर येतो. मात्र हवामान बदलाच्या परिणामामुळे मराठवाड्यातील केसर आंब्याला ऑक्टोबरमध्येच मोहर आल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोकणातील हापूससोबत केसरही फेब्रुवारी महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील केसर आंबा आता जगभरात प्रसिद्ध झाला आहे. जगभरातून केसरला मागणी असते. दरवर्षी केसरला डिसेंबर ते जानेवारीदरम्यान मोहर येतो आणि एप्रिलच्या पहिल्या सप्ताहानंतर केसर बाजारात दाखल होतो. तेव्हा बाजारात केसरला चांगला दरही मिळतो. मात्र, तत्पूर्वीच फेब्रुवारी महिन्यात कोकणचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस बाजारात दाखल होत असतो. हापूसला चांगली मागणी असल्याने भावही सर्वाधिक मिळतो.
वास्तविक या दिवसांत फक्त हापूस आंब्याला कोकणात काही प्रमाणात मोहर येतो. तसेच बारामासी या वाणास तर वर्षभर मोहर येतो, मात्र हा वाण व्यापारीदृष्ट्या तेवढा महत्त्वाचा नाही. केसरला आता आलेल्या मोहरास फेब्रुवारीमध्ये फळे काढणीस येऊ शकतात, ज्याला हापूससारखाच चांगला भाव मिळू शकतो. - डॉ. भगवानराव कापसे, उपाध्यक्ष, केसर आंबा बागायतदार संघ
यावर्षी मात्र प्रथमच केसर आंब्याच्या झाडांना ऑक्टोबर महिन्यात मोहर लागला आहे. कोकणातील हापूस आंब्यालाही याचवेळी मोहर लागत असतो. यामुळे यंदा प्रथमच फेब्रुवारी २०२४ मध्ये हापूससोबतच केसर बाजारात दाखल होऊ शकतो. याविषयी आंबा संशोधक भगवानराव कापसे म्हणाले की, यावर्षी मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाला. बदललेल्या हवामानामुळे केसर आंब्याच्या झाडांना यंदा प्रथमच ऑक्टोबरमध्ये मोहर लागल्याचे दिसून येत आहे. वास्तविक आपल्याकडे डिसेंबर, जानेवारीमध्ये आंब्याच्या झाडांना मोहर लागत असतो. आणि उत्पादनाला सुरुवातही एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर होत असते. यावर्षी पंढरपूरजवळील सागर गावधरे, धाराशिव जिल्ह्यातील पार्डीचे विठ्ठल चौधरी आणि नाशिक जिल्ह्यातील रान वडगाव येथील संदीप जाधव यांच्या केसर बागेतील १५ ते २० टक्के झाडांना मोहर लागला आहे. परिणामी, दीड महिना आधी मोहर लागल्याने उत्पादनही दीड महिना आधी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सुरू होईल आणि केसरला चांगला भाव मिळेल.