भास्कर कवाद
निघोज : यंदा रब्बी हंगामातील कांद्याचे पीक चांगले आहे. मात्र त्याला भावही चांगला मिळेल का? अशी भावना पारनेरचा कांदा पट्टा अशी ओळख असलेल्या निघोज, वडनेर, देवीभोयरे, अळकुटी, राळेगण, थेरपाळ परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. याबरोबरच निसर्गाचीही साथ मिळणे गरजेचे आहे.
कुकडी कालवा व कुकडी नदीच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांचे कांदा मुख्य पीक आहे. दरवर्षी हजारो हेक्टवर कांदा लागवड होते. तसेच फळबागाही मोठ्या प्रमाणावर आहेत. मागील काही वर्षांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा व इतर पिकांना फटका बसत आहे.
यंदा हंगामाच्या सुरुवातीला अवकाळी, गारपिटीचा कांदा पिकाला तडाखा बसला. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा कांदा लागवड केली. कांदा पिकासाठी गेल्या काही दिवसांपासून पोषक हवामान होते. त्यामुळे कांद्याचे उत्पादनही चांगले मिळण्याची शक्यता आहे.
मात्र भावही चांगला मिळावा, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. मागील तीन वर्षांपासून ठरावीक शेतकऱ्यांच्याच कांदा पिकाचे पैसे होतात. यंदा तरी सर्वच शेतकऱ्यांना कांदा भाव मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
मार्च-एप्रिलमध्ये कांदा पिकाला चांगला भाव राहिल्यास शेतकरी शेतातून काढलेला कांदा लगेचच विक्रीसाठी मार्केटला पाठवितात. त्यामुळे कांदा चाळीमधील उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळतो. शेतकरी कुटुंबे वर्षाचे आर्थिक नियोजन करून घरातील शुभकार्ये धुमधडाक्यात पार पाडतात. - दिलीप ढवण, कांदा उत्पादक, निघोज
शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे चांगले पैसे झाल्यास कुटुंबाच्या सगळ्या आर्थिक गरजा भागवून बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात आर्थिक तेजी आणण्यासाठी शेतकरी वर्ग महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे बाजारपेठेमध्ये तेजी आणायची असेल तर कांद्याला चांगला भाव मिळणे गरजेचे आहे. - दत्तात्रय म्हस्के, कांदा उत्पादक, चोंभूत
यंदा गारपिटीमुळे सुरुवातीच्या हंगामात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी दुबार कांदा लागवड केल्यामुळे खर्च वाढला आहे. चांगल्या हवामानामुळे कांदा पीक चांगले आले आहे. राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसू नये ही अपेक्षा. - संतोष येवले, कांदा उत्पादक, रेनवडी