सांगोला : रब्बी हंगाम ज्वारीपेरणीपूर्व पावसाचा सुमारे १५ दिवस खंड पडल्याने ज्वारीचीपेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता दिसून येत आहे. बैलपोळा सणानंतर रब्बी ज्वारीच्या पेरणीला १५ सप्टेंबरनंतर सुरुवात होते.
मात्र, ५ दिवस झाले तरीही शेतकऱ्यांनी अद्याप चाड्यावर मूठ धरली नाही. दरम्यान, रब्बी ज्वारी ३६ हजार हेक्टर, मका, गहू व हरभरा पीक पेरणीचे एकूण सुमारे ५७ हजार १५७ हेक्टर क्षेत्रावर नियोजन केल्याचे सांगोला तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.
सांगोला तालुका तसा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो; परंतु मागील तीन-चार वर्षांच्या काळात टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा योजनेतून शाश्वत पाणी उपलब्ध झाल्यामुळे व पर्जन्यमान प्रमाणही वाढल्यामुळे शेतकरी आता खरीप हंगामाकडे वळू लागला आहे.
चालू वर्षी शेतकऱ्यांनी बाजरीपेक्षा मका लागवडीला अधिक प्राधान्य दिल्यामुळे सांगोला तालुका मका लागवडीत आघाडीवर आला आहे. महाराष्ट्रात दरम्यान, आपल्याकडे बैलपोळ्याच्या सणानंतर शेतकरी रब्बी ज्वारीसाठी पेरणीला सुरुवात करतो.
मात्र गेल्या १५ दिवसांत तालुक्यात एकही पेरणीयोग्य दमदार पाऊस न पडल्यामुळे ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार १५ सप्टेंबरनंतर रब्बी ज्वारीच्या पेरणी सुरुवात होते.
मात्र ५ दिवस झाले पावसाअभावी अद्याप शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरली नाही. १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर रब्बी ज्वारी पेरणीसाठी योग्य वेळ आहे; मात्र त्यानंतर १५ ऑक्टोबरनंतर उशिरा १५ नोव्हेंबरपर्यंत पेरणी चालते. मात्र उत्पादकता घटते.
हस्त नक्षत्रावर शेतकऱ्यांची भिस्त
● हवामान खात्याच्या अंदाजानुसार १४ ते २६ सप्टेंबर उत्तरा नक्षत्र (रब्बीचा पाऊस) होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानंतर गुरुवार २६ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरपर्यंत हस्त नक्षत्राचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
● उत्तरा नक्षत्राच्या पावसाची अजून आठवडाभर आशा आहे. या काळात पेरणीयोग्य पाऊस पडला तरच रब्बी ज्वारी पेरणीला सुरुवात होणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांकडून रब्बी ज्वारीच्या पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सांगोला तालुक्यात रब्बी हंगाम २०२४-२५ पीकपेरणी पुढीलप्रमाणे ज्वारी ३६ हजार हेक्टर, मका १५ हजार हेक्टर, गहू ३ हजार हेक्टर, हरभरा ३ हजार हेक्टर, करडई १०० हेक्टर, सूर्यफूल ५० हेक्टर असे सुमारे ५७ हजार १५० हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. - शिवाजी शिंदे तालुका कृषी अधिकारी, सांगोला