Join us

यंदा पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार पर्यावरणाचे धडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 10:07 AM

रिसोड जिल्ह्यातील शाळा १ जुलैपासून सुरू होत आहेत. यंदा शाळेच्या पहिल्या दिवसांपासूनच शाळेत इको क्लब स्थापन करून पर्यावरण संरक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृती कार्यक्रम सुरू केला जाणार आहे.

विवेकानंद ठाकरे

रिसोड जिल्ह्यातील शाळा १ जुलैपासून सुरू होत आहेत. यंदा शाळेच्या पहिल्या दिवसांपासूनच शाळेत इको क्लब स्थापन करून पर्यावरण संरक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृती कार्यक्रम सुरू केला जाणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, भविष्यात चांगले यशस्वी नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट कौशल्ये आणि क्षमता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी इको क्लब शाळांमध्ये सुरू केला जाणार आहे. पाणी, नैसर्गिक संसाधनांचे जतन, स्वच्छता, आदींच्या माध्यमातून पर्यावरण जाणीव जागृती विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्याचा यामागे मुख्य उद्देश आहे.

त्यामुळे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व शाळांमध्ये इको क्लब निर्माण करून त्याद्वारे अभ्यासासोबत पर्यावरण रक्षणाचा कृती कार्यक्रम सुरू होणार आहे. इको क्लब फॉर मिशन लाईफ असे या उपक्रमाचे नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबत झाडांचाही सहवास लाभणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच पर्यावरण संरक्षणाचे उपक्रम सुरु करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत.

असा आहे पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम

■ प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचा इको क्लब स्थापन करून त्या अंतर्गत समित्या नेमून त्यांना थीमनुसार जबाबदाऱ्या वाटून दिल्या जातील.

■ १ ते १० जुलैपर्यंत रोज एका उपक्रमासाठी विशिष्ट थीम दिली जाईल.

■ त्यानुसार रॅली, स्पर्धा घेतली जाईल. विद्यार्थी प्रत्यक्ष कृती करतील. तसेच गावातही पर्यावरणाबाबत जनजागृती करतील.

या थिमनुसार होणार कामे

■ आरोग्यदायी जीवनशैली: या थीम अंतर्गत निसर्ग फेरी काढली जाईल. स्थानिक परिस्थिती अनुरूप वृक्षलागवड केली जाईल.

■ शाश्वत अन्नप्रक्रिया : परसबाग करणे, शाळेतील ओला कचरा वापरून किचन गार्डनसाठी खत तयार केले जाईल. भरडधान्याशी संबंधित स्पर्धा आयोजन.

■ ई-कचरा कमी करणे प्रत्येक शाळेत ई-कचरा संकलन केंद्र केले जाईल. त्याची विल्हेवाट लावण्यात येईल.

■ कचरा कमी करणे : स्वच्छता जनजागृती मोहीम राबविली जाणार, पाण्याची शुद्धता तपासली जाणार.

इको क्लब निर्माण करून विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष शिबिर घेण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन होते. परंतु तीव्र उन्हामुळे शिक्षकांनी या बाबीला विरोध केला. त्यामुळे आता शाळेच्या पहिल्या दिवसापासून उपक्रम राबवल्या जाणार आहे. विद्यार्थी कृतिशील कसा होईल या बाबीकडे प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. - राजेंद्र शिंदे शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक.

टॅग्स :पर्यावरणशाळारिसोडविदर्भशेती क्षेत्रग्रामीण विकास