Join us

यंदा हापूस बाजारात येण्यासाठी होतोय लेट; बागायतदारांची आंबा वाचविण्यासाठी मोठी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:16 IST

यावर्षी फेब्रुवारीत आंबा बाजारात आला तरी प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा लांबल्यामुळे डिसेंबरपासून थंडी सुरू झाली. याच कालावधीत मणिपूर येथे झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात ढगाळ हवामान होते.

रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, गेल्या चार दिवसात पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. उन्हाच्या झळा असह्य होत असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या तापमानाचा परिणाम हापूसवर झाला असून, उन्हामुळे आंबा भाजू लागला आहे. फळावर डाग पडले असून, गळतीही वाढली आहे.

गेल्या १५ ते २० दिवसांपासून सकाळच्या सत्रात थंड वातावरण होते. मात्र, दुपारनंतर कडाक्याचे ऊन पडत आहे. रत्नागिरीत २१ फेब्रुवारीपासून तापमानात वाढ झाली असून, सकाळपासूनच उन्हाच्या झळा बसत आहेत.

नागरिकांना उन्हाचा त्रास तर होत आहे, शिवाय आंबा पिकालाही याचा फटका बसला आहे. वातावरणातील बदलामुळे यावर्षीही आंबा पीक संकटात सापडले आहे. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई, तसेच स्थानिक बाजारपेठेत आंबा पेटी विक्रीला दाखल झाली होती.

यावर्षी फेब्रुवारीत आंबा बाजारात आला तरी प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा लांबल्यामुळे डिसेंबरपासून थंडी सुरू झाली. याच कालावधीत मणिपूर येथे झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. त्यामुळे झाडांना पालवी आली आणि मोहर येण्याची प्रक्रिया लांबली.

अनेक झाडांवर पालवी आणि मोहर अशी संमिश्र स्थिती होती. त्यानंतर जानेवारी महिन्यातील थंडीने पालवी जून झालेल्या झाडांना मोहर आला; परंतु निव्वळ फुलोरा राहिला. अपेक्षित फळधारणा झालेली नाही. पहिल्या टप्प्यातील आंब्याचे प्रमाण अत्यल्प असून, लवकरच परिपक्व होणार आहे.

उच्चांकी तापमानरत्नागिरीत २६ फेब्रुवारी २०१८ मध्ये भारतीय हवामान विभागाने नोंदविलेले रत्नागिरीचे तापमान ३८ अंश सेल्सिअस हे उच्चांकी तापमान होते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ३२ ते ३३ अंश सेल्सिअस कमाल व १९ ते २० अंश सेल्सिअस किमान तापमान असते. २०२८ नंतर आता सहा वर्षांनी यंदाच्या २६ फेब्रुवारी रोजी ३९ अंश सेल्सिअस अशी उच्चांकी नोंद झाली आहे.

बागायतदारांची कसरत गेल्या काही दिवसांपासून उष्मा वाढल्यामुळे कैरी वाचविण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरू आहे. उष्णतेमुळे आंबा भाजत असून, फळांवर काळे डाग पडले आहेत. ही फळे काही दिवसातच गळून पडतात. गळ मोठ्या प्रमाणात झाल्यास आधीच कमी असलेल्या उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

अवघे २५ ते ३० टक्केच उत्पादन● जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारे आंबा पीक यावर्षीही नैसर्गिक संकटात सापडले आहे. यावर्षी पावसाळा लांबल्याने डिसेंबरपासून थंडी सुरू झाल्याने मोहर प्रक्रियेला प्रारंभ झाला. पालवी व मोहर अशी संमिश्र स्थिती होती. कडाक्याच्या थंडीमुळे मोहर भरपूर आला; परंतु निव्वळ फुलोरा राहिला, फळधारणा झालीच नाही.● मोहर करपून काळा पडला. पुनर्मोहरामुळे फळांची गळ मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे झाडावर आंबा अल्प प्रमाणात आहे. वातावरणातील बदलामुळे यावर्षी जेमतेम २५ ते ३० टक्केच आंबा उत्पादन असून, योग्य दर न मिळाल्यास बागायतदारांची आर्थिक गणिते विस्कटणार आहेत.

थ्रीप्स, तुडतुडा कायमपालवीवर तुडतुडा, कीडरोगाचा प्रादुर्भाव झाला होता. बागायतदार हवामानातील बदलाचा अभ्यास करून तातडीने प्रतिबंधात्मक कीटकनाशकांची फळवारणी करत आहे. मात्र, तात्पुरते नियंत्रण मिळविण्यास बागायतदारांना यश मिळत असले, तरी कायमस्वरूपी प्रभाव पडत नाही. त्यातच थ्रीप्सचे संकट सतत आहेच, बाजारात महागडी कीटकनाशके असली तरी ती प्रभावी नसल्यामुळे बागायतदारांचा खर्च वाढतच आहे. त्यामुळे थ्रीप्स, तुडतुड्यावर दर १५ ते २० दिवसांनी कीटकनाशकांची फवारणी करावीच लागत आहे.

पीक झाले खर्चिकखत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत खर्च मोठ्या प्रमाणावर होतो. खतांचे वाढते दर, महागडी कीटकशनाशके, मजुरी दरात वाढ, इंधन खर्च, पॅकिंग हा सर्व खर्च विचारात घेता आंबा पेटीसाठी होणारा एकूण खर्च व मिळणारा दर याची सांगड घालणे अवघड होऊन बागायतदारांची आर्थिक गणिते विस्कटत आहेत. लाकडी खोक्यात ४ ते ७ डझनाच्या पेट्या भरल्या जातात. खोका/पिंजऱ्याचे दरात वाढ झाली आहे. इंधनदरात वाढ झाल्यामुळे वाहतूकीचा खर्चही वाढला आहे. हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचे परिणाम आंबा पिकावर होत असून, आंबा पीक दिवसेंदिवस खर्चिक बनले आहे.

पेटीला १० ते १२ हजार दर● गतवर्षी फेब्रुवारीमध्ये आंबा पेटी मुंबई, तसेच स्थानिक बाजारपेठेत विक्रीला आली होती. यावर्षी फेब्रुवारीत आंबा आला; परंतु प्रमाण अत्यल्प आहे. मुंबई बाजारपेठेत रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा सिंधुदुर्गातील देवगड हापूसचे वर्चस्व आहे. सध्या पेटीला १० ते १२ हजार रुपये दर मिळत आहे.● आंबा हंगामाची सुरुवात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलमध्ये होऊन आंबा एकाचवेळी बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर गडगडण्याचा धोका अधिक आहे. यंदाचा आंबा हंगाम १० मेपर्यंतच असेल, असेही बागायतदार सांगत आहेत.

गेल्या काही दिवसांत उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या वाढत्या तापमानात छोटी फळे टिकू शकणार नाहीत, गळ होण्याचा धोका अधिक आहे. यावर्षी फेब्रुवारीत मोहर नसल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा असणार नाही. यावर्षी कॅनिंगसाठी घालण्याकरिता बागायतदारांना आंबा फार कमी उपलब्ध होणार आहे. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :आंबारत्नागिरीपीक व्यवस्थापनपीकफळेशेतकरीशेतीहवामान अंदाजतापमानपाणीबाजारमार्केट यार्डकीड व रोग नियंत्रण