Join us

Crop Loan यंदा पीककर्जाची रक्कम वाढली; कोणत्या पिकाला मिळणार किती कर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 10:14 AM

वरचेवर वाढणारे खरीप क्षेत्र व वाढणारा उत्पादन खर्च लक्षात घेऊन खरीप पीक कर्जासाठी हेक्टरी पीक कर्ज रकमेत वाढ केली आहे. बाजरी, मका, सूर्यफूल, तूर, भुईमुगासाठी बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज देण्याची तयारी ठेवली आहे.

अरुण बारसकरसोलापूर : जिल्ह्यात वरचेवर वाढणारे खरीप क्षेत्र व वाढणारा उत्पादन खर्च लक्षात घेऊन खरीपपीक कर्जासाठी हेक्टरी पीक कर्ज रकमेत वाढ केली आहे. बाजरी, मका, सूर्यफूल, तूर, भुईमुगासाठी बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज देण्याची तयारी ठेवली आहे. उसाला सर्वाधिक हेक्टरी एक लाख ३२ हजार ७०० रुपये इतके कर्ज बँका देणार आहेत.

लाख-दोन लाखांहून अधिक खरीप पेरणी सोलापूर जिल्ह्यात तरी अशक्य होती. कारण खरीप पेरणीचा कालावधी असताना जून-जुलै महिन्यांत पेरणी व पीकवाढीसाठी पुरेसा पाऊस पडत नसायचा. उशिराने पडणाऱ्या पावसाच्या भरोवशावर तूर, मका ही पिके अधिक क्षेत्रावर घेतली जात असायची. कारण सिंचनाची सुविधा व सिंचन क्षेत्र फारच कमी होते.

एखाद्या शेतकऱ्याने खरीप पेरले व पावसाने ओढ दिली तर पीक हमखास जायचे. मात्र अलीकडे विहिरी, बोअर, उजनी व लगतचे उतर तलाव, तसेच स्प्रिंकलरने पाणी देऊन पीक वाचवू शकते. शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी पर्यायी सुविधा झाल्याने तसेच जून-जुलै महिन्यांत पाऊसही हजेरी लावत असल्याने खरीप क्षेत्रात वाढ होत आहे.

याशिवाय पिकाला पावसाचा फटका बसलाच तर पीकविमा कंपनी मदतीला येतेच. त्यामुळे वाढणारे खरीप क्षेत्र लक्षात घेऊन राज्य शासनाने कर्जविषयक धोरणात बदल केला आहे. खरीप हंगामातील पिकांना कर्ज वाटप व्याप्ती वाढवली आहे. शिवाय कर्ज रक्कमही दरवर्षी वाढविली जाते.

सोयाबीनसाठीही बँका देतात कर्ज● पाच वर्षांखाली बार्शी, अक्कलकोट तालुक्यांत दाखल झालेले सोयाबीन आता खरीप हंगामातील प्रमुख पीक झाले आहे. मागील वर्षी सव्वालाख हेक्टरपर्यंत सोयाबीन पेरले होते. त्यामुळे सोयाबीनसाठीही पीककर्ज बँका देत आहेत.● सोयाबीन बागायतसाठी मागील वर्षी हेक्टरी ४९ हजार ५०० रुपये पीककर्ज देता येत होते. यावर्षी बागायत सोयाबीनसाठी रक्कम १३ हजार १०० रुपयांनी कमी करण्यात आली असून ती ३६ हजार ४०० रुपये करण्यात आली आहे. यंदा जिरायत सोयाबीनसाठी हेक्टरी ३४ हजार ४०० रुपये पीककर्ज मिळणार आहे. आडसाली उसाला हेक्टरी एक लाख ३२ हजार ७०० रुपये व सुरू लागवडीसाठी हेक्टरी सव्वालाख रुपये पीककर्ज मिळणार आहे.

कोणत्या पिकाला किती कर्ज?

पीकवर्ष २०२३वर्ष २०२४
ज्वारी२७,५००२८,६००
बाजरी२९,७००३०,०००
भुईमूग४०,६००४३,५००
तूर४४,०००४५,०००
सूर्यफूल३५,०००३५,४००
कापूस५५,०००५५,५००
सोयाबीन४९,५००३६,४००
मका४७,३००४८,०००
मिलेट्स३५,०००३५,०००

(ही कर्ज रक्कम हेक्टरी व बागायती आहे. जिरायत पिकासाठी कर्जमर्यादा रक्कम प्रत्येक पिकांची यापेक्षा कमी आहे.)

बँका शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पीककर्ज देत आहेत. शेतकऱ्यांनी वेळेत परतफेड केली तर अशा शेतकऱ्यांना बँका सहज कर्ज देतात. शेतकऱ्यांनी पुरेशी ओल झाल्यानंतर पेरणी करावी. खरिपासाठी कर्ज मिळण्यासाठी डीसीसी व आपल्या गावच्या दत्तक बँकेशी संपर्क करा. - दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

 

टॅग्स :पीक कर्जपीकशेतीशेतकरीपेरणीखरीपसोयाबीनमकाबाजरीज्वारीसुर्यफुलकापूस