Join us

Kharip Season : यंदा खरिपात 'या' पिकाची लागवड वाढणार! कोणत्या पिकांचा किती असेल पेरा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 9:02 PM

यंदा जवळपास १ कोटी ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड केली जाणार आहे.

पुणे : मान्सूनचा पाऊस भारताच्या मुख्य भूमीवर ३० मे रोजीच पोहोचला असून राज्यात लवकरच मान्सूनचे आगमन होणार असून शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. बियाणे आणि खतांची खरेदी शेतकऱ्यांनी सुरु केली असून मशागतीची कामेही पूर्ण झालेली आहे. तर यंदा राज्यामध्ये १ कोटीर ४३ लाख हेक्टर एवढे क्षेत्र पेरणीखाली आणि लागवडीखाली येणार आहे. 

दरम्यान, राज्यामध्ये खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, कडधान्ये आणि तृणधान्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तर त्यापैकी यंदा अंदाजित ५० लाख हेक्टर क्षेत्र हे सोयाबीनचे असणार आहे. त्यापाठोपाठ ४० ते ४२ लाख हेक्टर क्षेत्र हे कापसाचे असणार आहे. कापसाच्या वाणामध्ये तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे २००० सालापासून कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. 

त्याचबरोबर यंदा भात पिकाची लागवड ही १५ लाख हेक्टरवर होणार आहे. मागच्या काही दशकापासून भात पिकाचे क्षेत्र हे तेवढेच आहे. त्यानंतर खरीप ज्वारीची लागवड ही १ लाख ५० हजार हेक्टरवर केली जाणार आहे. 

खरिपात बाजरीचे क्षेत्र ६ लाख हेक्टर, नाचणीचे क्षेत्र ८० हजार हेक्टरच्या आसपास होणार असल्याची माहिती कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे. यंदा पावसाची स्थिती चांगली असल्यामुळे या आकड्यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. 

कोणत्या पिकाचे क्षेत्र वाढेल?मागच्या हंगामात म्हणजे २०२३-२४ सालात सोयाबीन, कापूस, कांदा आणि इतर अन्नधान्ये पिकांना चांगला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर तुरीला या हंगामात चांगला दर मिळाल्याचे चित्र आहे. सध्याचे तुरीचे दर पाहिले तर ९ हजार ते ११ हजार रूपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. त्यामुळे यंदा राज्यामध्ये तुरीचे क्षेत्र वाढणार असल्याची शक्यता आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमोसमी पाऊस