जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील विहिरी, बोअरसह इतर पाण्याचे स्रोत आटल्याने शेतकऱ्यांवर ठिंबक संच गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे फळबागा करपू लागल्या आहेत. एकेकाळी भरपूर पाणी असल्याने शेतकरी कुठल्याही पिकांना मोकाट पद्धतीने पाणी द्यायचे. मात्र, पुढे पाण्याची अडचण निर्माण होत गेल्याने शेतकऱ्यांनी पाण्याच्या बचतीवर भर दिला. यात तुषार व ठिबक सिंचनचा वापर वाढला आहे.
तुषार पद्धतीमध्ये ६० ते ७० टक्के पाण्याची बचत होते, तर ठिबक सिंचन पद्धतीमध्ये ८० ते ९० टक्के पाण्याची बचत होते. त्यामुळे पाण्याची बचत करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात ठिंबक सिंचन पद्धतीकडे वळले आहेत.
ठिबक गुंडाळून ठेवण्याची वेळ
शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून फळ बागांना व काही पिकांना ठिंबक सिंचन पद्धतीचा वापर सुरू केला आहे. मात्र, यंदा पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांवर ठिंबक संच गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे. पाण्याची बचत करण्याची शेवटची पद्धती म्हणजे ठिबक सिंचन होय. परंतु, यासाठी ही आता पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने शेतकऱ्यांवर ठिबक सिंचन संच हे गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा धोक्यात आल्या आहेत. तरी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यंदा मान्सून लांबला तर पाणी परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
निम्न दुधनामध्ये ५.८१ टक्के पाणीसाठा
परतूर तालुक्यातील सिंचन क्षेत्र प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मात्र, यावर्षी प्रकल्पात पाणीसाठाच झाला नाही, आज प्रकल्प हा मृत साठ्यात असून, -५.८१ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेत या प्रकल्पात ३१.४४ टक्के जिवंत पाणीसाठा होता.
यंदा नवीन ऊस लागवडही थांबली
परतूर तालुक्यात बागेश्वरी साखर कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढत आहे. मात्र, यंदाही विहिरी, बोअर आटल्याने व निम्न दुधना प्रकल्प मृत साठ्यात आल्याने आहे तेच उसाचे क्षेत्र धोक्यात आले आहे. पाण्याअभावी अनेक शेतकरी ऊस मोडत आहेत, तर शेतकऱ्यांनी नवीन ऊस लागवडही थांबली आहे.