मोसंबीच्या अंबिया बहाराची फळगळ ही एक मोठी समस्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसमोर मागील पाच वर्षांपासून निर्माण झाली आहे. प्रति वर्षी होत असलेल्या या फळगळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यंदा तर जुलैच्या सुरुवातीलाच मोसंबीची फळगळ सुरू झाली असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव परिसरामधील मोसंबी बागामध्ये मागील सात दिवसांपासून मोसंबीची फळे झाडाखाली गळून पडत आहेत. ही फळगळ दरवर्षी होत असलेल्या फळगळीमुळे सदृश आहे. अद्याप परिपक्क न झालेली हिरवी मोसंबीची फळे गळून पडत आहेत.
मागील सलग पाच वर्षांपासून अंबिया बहाराच्या मोसंबीची फळगळही सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये होत असे; परंतु यंदा ही फळगळ जुलैच्या सुरुवातीलाच सुरू झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.
मोसंबी फळगळीमुळे दरवर्षी शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या समस्येमुळे उत्पादन खर्चदेखील शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही, तरीदेखील शेतकऱ्यांनी मोसंबी बागा जोपासल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे मोसंबी फळबगा (Orchard) धोक्यात आहेत, फळगळीच्या समस्यांमुळे शेतकरी मोसंबीची लागवड करण्यासाठी विचार करीत आहे.
परिणामी, मोसंबी लागवडीचे क्षेत्र झपाट्याने कमी होत असून, मोसंबी बागा नामशेष होण्याची परिस्थिती उद्भवली आहे. मोसंबी फळगळीवर अद्याप तरी अचूक प्रतिबंधात्मक उपाय कृषी विभागाकडून सांगण्यात येत नाही.
संशोधकांनी दखल घ्यावी
• मोसंबीची फळगळ ही फार मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली असून, आगामी काळात यावर प्रतिबंधात्मक उपाय शोधला गेला नाही, तर मोसंबीच्या फळबागा शिल्लक राहणार नाहीत.
• यामुळे सर्वच विद्यापीठातील मोसंबी संशोधकांनी याची दखल घेऊन यावर प्रतिबंधात्मक उपाय शोधणे गरजेचे आहे.
हेही वाचा - Pomegranate Success Story दहावी पास शेतकऱ्याची भगव्या डाळिंबातून कोटींची आर्थिक क्रांती