सोलापूर : जिल्ह्यातील पीक पद्धत बदलत असल्याचे कृषी विभागाच्या येत्या खरीप हंगाम नियोजनावरून दिसत आहे. कारण, अपेक्षित खरीपपेरणी क्षेत्र तब्बल पावणेचार लाख हेक्टर गृहीत धरण्यात आले आहे. सरासरीपेक्षा ८७ हजार तर मागील वर्षी पेरणी झालेल्यापेक्षा ३१ हजार हेक्टर खरीप क्षेत्र वाढेल, असा कृषी खात्याचा अंदाज आहे.
सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी खरीप पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे. एकीकडे एकूण खरीप पेरणी क्षेत्रात वाढ होत असताना दुसरीकडे भात, खरीप ज्वारी, बाजरी, खरीप भुईमूग, कापूस या पिकांचे क्षेत्र घटताना दिसत आहे.
सोयाबीन, उडीद, मूग, तूर, ऊस व खरीप मक्याच्या क्षेत्रात दरवर्षीच वाढ होत आहे. जिल्ह्याचे खरीप हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र २ लाख ९० हजार हेक्टर इतके असताना मागील सलग पाच वर्षे ३ लाख ४० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
मागील वर्षी सरासरी २ लाख ८९ हजार ५७० हेक्टर क्षेत्र असताना ३ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पेरा झाला होता. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असे एकामागून एक अंदाज वर्तविण्यात येत आहेत. त्यामुळे खरीप पेरणी क्षेत्रातही वाढ होईल, असे गृहीत धरून कृषी खात्याकडून नियोजन करण्यात येत आहे.
यंदा तब्बल तीन ७७ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणी गृहीत धरण्यात आली आहे. मागील वर्षी सरासरीपेक्षा ५७ हजार हेक्टर अधिक क्षेत्र खरीप पेरले होते. यंदा त्यापेक्षा अधिक ३० हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पेर होईल, असे सांगण्यात आले.
तूर, मूग, बाजरी, सूर्यफूल वाढेल
मागील चार वर्षात बार्शी, उत्तर व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यांत झपाट्याने सोयाबीन पेरणी क्षेत्र वाढले आहे. यावर्षी दोन हजार हेक्टर सोयाबीन पेरा वाढेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. तूर ५ हजार हेक्टर, बाजरी ६ हजार हेक्टर, सूर्यफूल ७ हजार व मूग क्षेत्रात वाढ होईल, असा कृषी खात्याचा अंदाज आहे. मका व उडीद क्षेत्रात वाढ गृहीत धरण्यात आली नाही.
प्रत्यक्षात पेरणी क्षेत्र हेक्टर लाखांत
२०२०- ३.७४
२०२१- ३.४०
२०२२- ३.५९
२०२३- ३.४६
२०२४- ३.७७ (नियोजित)
२०२० पर्यंत सरासरी पेरणी क्षेत्र- २,३४,६४१ हेक्टर
२०२३ मध्ये सरासरी पेरणी क्षेत्र- २,८९,५७० हेक्टर
यंदा पाऊस चांगला पडण्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे खरीप हंगाम चांगला होईल. खरीप क्षेत्रात वाढ होईल. सरत्या पावसाळ्यात पाऊस कमी पडल्याने पाण्याअभावी क्षेत्र मोकळी झाली आहेत. या क्षेत्रात खरीप पेरणी होईल. त्यामुळे खरीप क्षेत्र वाढेल. - दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर
अधिक वाचा: गावरान कोंबडी, शेततळ्यातील मत्स्यपालन, मधमाशा पालनासाठीच्या कर्ज मर्यादित मोठी वाढ