Join us

यंदा साखर कारखान्यांना करावी लागणार ऊस दराची स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 8:30 AM

येणारा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस तोडणी व वाहतूक दरात वाढ करण्याची मागणी ऊस तोडणी कामगार व वाहतूक संघटनेतून होत आहे. उसाला तीन हजार रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

उसाचे आगार अशी ओळख असलेल्या नेवासा तालुक्यातच यंदा ऊस टंचाई निर्माण होणार आहे. सतत बदलते हवामान, सातत्याने मिळणारा कमी भाव, तोडणीसाठी मारावे लागणारे हेलपाटे यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी इतर नगदी पिकांकडे वळला आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्यांना जास्तीत जास्त ऊस भाव देण्यासाठी स्पर्धा करावी लागणार आहे.

येणारा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस तोडणी व वाहतूक दरात वाढ करण्याची मागणी ऊस तोडणी कामगार व वाहतूक संघटनेतून होत आहे. उसाला तीन हजार रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. शिवाय ऊस टंचाईचा सामना साखर कारखान्यांना करावा लागणार आहे. नेवासा तालुक्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे उसाची वाढ खुंटली, हुमणी अळीचा प्रादुर्भाव ऊस पिकावर झाला. या सर्व कारणांमुळे उसाचे उत्पादन ३० टक्के घटणार आहे.

एकीकडे कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता वाढली तर दुसरीकडे ऊस उत्पादन घटले. यामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम फक्त तीन महिनेच चालेल. हा हंगाम चालविण्यासाठी साखर कारखान्यांना ऊस मिळविण्यासाठी कसरत करावी लागेल. उसाची कमतरता आहे. त्यामुळे उसाची पळवापळवी होईल. जो कारखाना उसाला जादा भाव देईल. ऊस उत्पादक शेतकरी अशा कारखान्याला ऊस देतील. यामुळे साखर कारखान्यांना ऊस भावाची स्पर्धा करावी लागणार आहे.

ऊस उत्पादन खर्चात झालेली वाढ, विस्कळीत वीजपुरवठा, बिबट्या व रानडुकरांचा त्रास, अशा हालअपेष्टा सहन करून पिकविलेल्या उसाला प्रतिटन तीन हजार रुपये भाव मिळाला पाहिजे. - नीलेश शिंदे, ऊस उत्पादक शेतकरी, रांजणगाव

नेवासा तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक असते. कमी पावसामुळे फक्त ५ हजार हेक्टर क्षेत्रावर आडसाली उसाची लागवड झाली. हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मे महिन्यात उपाययोजना करण्यात आली होती. - धनंजय हिरवे, नेवासा तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :ऊससाखर कारखानेपीकशेतकरी