हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीसाठी कृषी विभाग कामाला लागला असून, शेतकरीही शेतीतील कामे आटोपण्याची धडपड करताना दिसत आहे. यंदा प्रामुख्याने हळद, तूर, कापूस या पिकांचे क्षेत्र वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या वर्षी ३ लाख ८९ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यंदा ४ लाख ५ हजार हेक्टरवर होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये खरीप ज्वारी ३२६७ हेक्टर, मका ५९३ हेक्टर, बाजरी ११२ हेक्टर, तूर ३६ हजार ७९९ हेक्टर, मूग ५९१४ हेक्टर, उडीद ५४६१ हेक्टर, सोयाबीन २ लाख ७७ हजार ८९० हेक्टर, कापूस ३२ हजार ८०७ हेक्टर, ऊस ७ हजार ६५३ हेक्टर तर हळद ३४ हजार ५८८ हेक्टरवर लागवडीची शक्यता आहे.
यंदा हळद व तुरीचे दर वधारल्याने अनुक्रमे १० हजार व २५०० हेक्टरने लागवड वाढण्याची शक्यता आहे. कापूसही दरवाढीमुळे १४६० हेक्टरवर वाढू शकतो. तर तृणधान्य उत्पादन व चारा वाढीसाठी मका, बाजरी तर कडधान्य वाढीसाठी तूर, मूग, उडीद या पिकांचे क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न होत आहेत. यासाठी कृषी विभागाकडून काही बियाणे अनुदानावर मिळण्याचीही शक्यता असून तूर्त तयारी सुरू आहे.
अबब... ६८ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार
हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा होतो. यासाठी बियाणेही मोठ्या प्रमाणात लागते. जवळपास २ लाख ७७ हजार हेक्टरसाठी ६८ हजार ५५७ क्विंटल बियाणी लागणार आहे. यात सार्वजनिक १० हजार ४८६ तर खाजगी ५८हजार ७१ क्विंटल बियाणे अपेक्षित आहे. त्यापाठोपाठ तुरीचे १ हजार ९३१ क्विंटल बियाणे लागणार आहे.
कापसाची १ लाख ६४ हजार पाकिटे हवीत
संकरित कापसाची ३२ हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित असल्याने १ लाख ६४ हजार ३४ पाकिटे कंपन्यांकडून मागवावी लागतील. ज्यारी २३४ क्चिटल, बाजरी ३.३६ क्चिटल, मूग १०६ क्विंटल, उडीद १४० क्विंटल, मका २६.६९ क्विंटल, तीळ १.६९ क्विंटल, भुईमूग ५ क्चिटल अशी इतर वाणांची बियाणांची मागणी अपेक्षित आहे.
२५८० टन खतांचा संरक्षित साठा
खरीप हंगामासाठी २५८० मे.टन खताचा संरक्षित साठा करण्याचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील संनियंत्रण समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. यासाठी तीन गोडाऊनला मान्यताही देण्यात आली आहे. तर कंपनीनिहाय करावयाचा संरक्षित साठाही निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये युरिया १८५० मे. टन तर डी.ए.पी. ७३० मे.टन साठा करण्यात येणार आहे. अजून प्रत्यक्षात असा साठा झालेला नाही.
हेही वाचा - ज्वारी, मका कापणी केलेल्या शेताची; मजूर करतात मोबाइल ॲपवर मोजणी