यावर्षीच्या खरीप हंगामात ७८ हजार १ हेक्टर लागवडीखालील सर्वसाधारण क्षेत्र असून, कापूस या नगदी पिकासाठी ५० हजार १८१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. २ लाख ५० हजार ९०३ कापूस बियाण्यांच्या पाकिटांची आवश्यकता राहणार आहे.
मात्र, शेतकऱ्यांनी एकाच वाणाचा आग्रह धरू नये. जमिनीनुसार वाणाची निवड करावी, सोयाबीन या पिकाची पेरणीपूर्व उगवण क्षमता तपासावी, असे आवाहन नांदेड जिल्ह्यातील किनवट पंचायत समितीच्या कृषी विभागाने केले आहे.
खरीप हंगाम २०२३मध्ये सर्वसाधारण क्षेत्राच्या १ हजार २७९ हेक्टर क्षेत्रात जास्तीची पेरणी झाली होती. कापूस या मुख्य पिकाची ४८ हजार ९५३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. खरीप हंगाम २०२४ चे नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षी १ जूनपासून कापूस बियाण्याची विक्री होत असे.
यावर्षी १५ मेपासून करण्यात येत असल्याने यावर्षी कापूस पिकाचे क्षेत्र वाढणार आहे, असे अनुमान आहे. हे सर्व काही पावसाच्या भरवशावर आहे. पावसाने दगा दिला तर मात्र कापसाचे क्षेत्र घटून सोयाबीनचे क्षेत्र वाढेल, असेच काहीसे खरीप हंगामातील चित्र असेल.
खरीप हंगामात साधारणपणे २८ हजार ८०८ मेट्रिक टन रासायनिक खतांची आवश्यकता आहे. २ लाख ५० हजार ९०३ कापूस बियाण्यांच्या पाकिटांची आवश्यकता आहे. त्यानुसार खत उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आले आहे. बियाणे, खतांची खरेदी ही अधिकृत विक्रेत्यांकडूनच करावी, असे आवाहन पंचायत समितीचे कृषी अधिकारी शिवराम मुंडे यांनी केले आहे. तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन केली असून, नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
बोंड अळी टाळण्यासाठी
कापूस पिकावरील संभाव्य गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस पिकाची पेरणी १ जूननंतर करावी, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे. रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय, जैविक खता खताचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - कापूस लागवड करतांना या गोष्टींची ठेवा जाण; उत्पन्नाची वाढेल हमी पिकांची असेल शान